त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी गुलाबजलचा वापर केला जातो. विशेषत: उन्हाळ्यात याचा अधिक वापर केला जातो, कारण या सीजनमध्ये त्वचा अधिक तेलकट होऊ लागते. गुलाब पाण्यामुळे निस्तेज त्वचा, मुरुम, सनबर्न, मुरुमांचे डाग आणि त्वचेवरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. तुम्ही घरगुती फेसपॅकमध्येही गुलाबजलाचा वापर करु शकता. बाजारात हे गुलाबजल सहज उपलब्ध होते पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी फ्रेश गुलाबजल कसे तयार करायचे याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.
गुलाबजल घरी कसं तयार करायचं? बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

गुलाबजल तयार करण्यासाठी सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

आता एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि पाकळ्या बुडतील एवढेच पाणी घाला. जास्त पाणी घालू नका, नाहीतर गुलाबपाणी पातळ होईल.

हे भांड गॅसवर ठेवा आणि मध्यम आचेवर २०-३० मिनिटे पाणी चांगलं उकळू द्या. पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या उकळायला लागताच यातून छान सुगंध बाहेर यायला लागेल.

हे पाणी थंड करुन गाळून घ्या आणि एका बाटलीमध्ये तयार गुलाबजल भरुन ठेवा. हे पाणी अनेक आठवडे साठवून ठेवता येते.

तुम्ही तुमच्या त्वचेवर या पाण्याचा वापर करु शकता. नैसर्गिक उपाय असल्याकारणाने याचा आपल्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.






