दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मतदान होणार असून येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी आम आदमी पक्षासमोर भाजप व कॉंग्रेसचे कडवे आव्हान असणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीच्या रिंगणात महिला उमेदवार या निर्णायक ठरणार आहेत.
The number of women candidates is higher in Delhi Assembly Election 2025
यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तिन्ही प्रमुख पक्षांनी महिला उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप आणि आम आदमी पक्षाने 9-9 महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने यावेळी 7 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी सध्या आप नेत्या आतिशी मार्लेना विराजमान आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एकूण 699 उमेदवारांपैकी 96 महिला आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यंदा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये यावेळी महिलांवर लक्ष केंद्रीत करुन प्रचार केला जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सत्ताधारी आम आदमी पक्षाने आतिशी, पूजा बालियान, प्रमिला टोकस आणि राखी बिर्लन यांच्यासह पाच इतर महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. तर भाजपने रेखा गुप्ता, शिखा राय आणि प्रियंका गौतम यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसमधून अलका लांबा, अरिबा खान, रागिनी नायक आणि अरुणा कुमारी या प्रमुख महिला उमेदवार आहेत.
1993 च्या निवडणुकीमध्ये 1316 उमेदवारांच्या यादीत फक्त 58 महिला होत्या, त्यापैकी फक्त तीन महिला निवडणूक जिंकू शकल्या. त्यानंतर, 1998 च्या निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांची संख्या कमी झाली. तर 2003 च्या निवडणुकीत महिलांची संख्या 78 होती, त्यापैकी फक्त 9 टक्के महिला उमेदवार जिंकू शकल्या होत्या.
2008 मध्ये भाजपकडून चार महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी एकही जिंकली नाही. 2013 मध्येही महिलांना यश मिळाले नाही. 2015 मध्ये आठ तर 2020 मध्ये 6 महिलांना उमेदवारी दिली होती मात्र त्यापैकी एकही जिंकली नाही. काँग्रेसने 2008 मध्ये, आठ पैकी फक्त तीन महिला जिंकल्या. तर 2013, 2015 आणि 2020 मध्ये एकाही महिला उमेदवाराला विजय मिळाला नाही.
आम आदमी पक्षाने महिला उमेदवारांची संख्या सातत्याने वाढवली आहे. त्यांच्या पक्षात महिलांच्या विजयाचे प्रमाण चांगले राहिले आहे. 2013 मध्ये सहा महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी तिघांनी विजय मिळवला. तर 2015 मध्ये सर्व सहा महिला जिंकल्या होत्या. 2020 च्या निवडणुकीत पक्षाच्या 9 पैकी 8 महिला उमेदवारांनी विजय मिळवला.