मागील अनेक शतकांपासून साडी वस्त्र महिला परिधान करत आहेत. पैठणी साडी, बनारसी साडी इत्यादी जग प्रसिद्ध साड्यांसोबतच माहेश्वरी साडीची सुद्धा मोठी क्रेझ आहे. मध्य प्रदेशातील महेश्वर येथील ५,००० हातमागावर माहेश्वरी साडी विणण्यात आली होती. ही साडी १८ व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांच्या आश्रयाने लोकप्रिय झाली. वजनाने अतिशय हलकीशी, नाजूक काठ आणि सॉफ्ट सिल्क कापड असलेली माहेश्वरी साडी हळूहळू जगभरात प्रसिद्ध झाली. भारतीय बाजारपेठांमध्ये माहेश्वरी साडीला खूप जास्त मागणी आहे. सुती आणि रेशमी धाग्यांचे मिश्रण करून विणलेली साडी कार्यक्रमात किंवा कोणत्याही सोहळ्यात अतिशय सुंदर दिसते. (फोटो सौजन्य – istock)
राणी अहिल्याबाईचा वारसा असलेल्या माहेश्वरी साडीचा पारंपरिक इतिहास, जाणून घ्या हातमागावरील साडीची खासियत

माहेश्वरी साडी किल्ल्याच्या भिंती, नक्षीकाम आणि नर्मदा नदीच्या लाटांवरून तयार करण्यात आली. अहिल्याबाईंनी सुरत, मांडव आणि महाराष्ट्रातून कुशल विणकरांना बोलावून माहेश्वरी साडी तयार करून घेतली.

माहेश्वरी साडी उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये तुम्ही परिधान करू शकता. कारण सुटी आणि रेशमी धाग्यांचा वापर करून साडी विणली जाते. साडीवर चटई, वीट, हीरा, आणि लेहेरिया यांसारखे नमुने दिसतात.

माहेश्वरी साडीमध्ये दोन प्रकार उपलब्ध आहेत. गरभ रेशमी माहेश्वरी साडी केवळ रेशमी धाग्यांचा वापर करून बनवली जाते तर नीम-रेशमी साडी सुती आणि रेशमी धाग्यांचे मिश्रण करून विणली जाते. याशिवाय साडीमध्ये हँडब्लॉक प्रिंटेड महेश्वरी, ‘टिश्यू महेश्वरी, बाटिक आणि भगरु प्रिंट महेश्वरी, ‘गंगा-जमुना महेश्वरी यांसारखे प्रकार उपलब्ध आहेत.

लाल, हिरवा, जांभळा, काळा, डाळिंबी, गुलबक्षी, अंगूरी, तपकीरी आणि हलक्या फिकट, गडद रंगांमध्ये माहेश्वरी साडी तयार केली जाते. माहेश्वरी साडी विशेष पद्धतीने विणली जाते.

माहेश्वरी साड्या एक रंगांसोबतच कॉट्रॅस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. साडीवर विणलेली पारंपरिक बुट्टी आणि साडीच्या काठावर असलेली कर्णफुलें नर्मदा नदीच्या काठाच्या सौंदर्याची साक्ष देतात.






