Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगर महापालिकेवर ज्योती गाडे महापौर तर आणि धनंजय जाधव उपमहापौर
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा नेते माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. आज या तिन्ही नेत्यांनी सर्व ५२ नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात सुरुवातीला उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बैठकीत चर्चा करून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्का मोत’ब करण्यात आले. तशी घोषणा पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. नावांच्या घोषणेनंतर सर्व नगरसेवक महापालिका कार्यालयात गेले, नगरसचिव कार्यालयात नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे गाडे आणि जाधव यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे.
६ फेब्रुवारीला दोन्ही पदांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेत दाखल अर्जाची छाननी होईल. त्यानंतर बिनविरोध निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. महापौरपदाच्या उमेदवार असलेल्या ज्योती गाडे (राष्ट्रवादी) या भाजपाचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत. गाडे आणि जाधव यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून यापूर्वीही काम केले आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात महापौर आणि उपमहापौरपदांचे वाटप प्रत्येकी सव्वा वर्ष असे ठरले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तसे सांगितले, त्यामुळे पाच वर्षांत चार महापौर नगरकरांना पहायला मिळतील.
आज वडील शिवाजीराव कर्डिले साहेब हयात असते तर त्यांना मोठा आनंद झाला असता, असे सांगत महापौरपदाच्या उमेदवार ज्योतीताई गाडे यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, की अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर पहिल्या महापौरपदाचा मान मला मिळाला, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, अहिल्यादेवींचा आदर्श व वारसा अखंड ठेवण्यासाठी मी काम करीन. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास समर्थपणे पेलण्याचा मी प्रयत्न करेन.
KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे
अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदाचे उमेदवार धनंजय जाधव म्हणाले, की केंद्र, राज्य आणि शहर या तिन्ही पातळ्यांवर राष्ट्रवादी-भाजपा युतीची सत्ता आहे. नगरकरांना उत्तम सेवा देणे हीच आपली प्राथमिकता आहे. मूलभूत सुविधांपासून विकासाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नगरसेवकाना सोबत घेऊन काम करू, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन.
पहिल्या वर्षी स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे, सभागृहनेतेपद राष्ट्रवादीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपद राष्ट्रवादी आणि उपसभापतिपद भाजपकडे असे वाटप झाल्याचे सांगण्यात येते. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगरच्या नागरिकांचे लक्ष आता याकडे लागले आहे.






