फोटो - सोशल मीडिया
बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचा गुलाल उधळणार आहे. निवडणूक आयोग देखील कामाला लागले असून येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूका होणार आहेत. दरम्यान राज्यामध्ये महायुतीची तयारी जोरदार सुरु आहे. मात्र महायुतीमधील अजित पवार यांच्याबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजित पवार हे नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. आता आणखी एक माहिती समोर येत आहे. अजित पवार हे राज्यातील काही भाजप नेते व शिंदे गटातील नेत्यांवर नाराज आहे. ते ही नाराजी आणि त्या नेत्यांबाबत थेट दिल्ली दरबारी तक्रार दाखल करणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून महायुतीमधील काही नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. राज्यामध्ये समाजामध्ये आणि धर्मांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशी वक्तव्य सातत्याने केली जात आहेत. यामुळे राजकारणासह समाजामध्ये देखील याबाबत चर्चा होत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज आहेत. महायुतीमधील वाचाळवीर नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट तसेच भाजप आमदार नितेश राणे, खासदार अनिल बोंडे यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
अजित पवार यांनी महायुतीमधील शिंदे गट व भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. आता देखील बुलढाण्यामधील सभेमध्ये सत्ताधारी व विरोधी कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त विधानं करु नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हणत अजित पवार यांनी वाचाळवीर नेत्यांना सुनावले आहे. आता याबाबत ते दिल्लीला भाजप श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.
अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे दिल्लीमध्ये तक्रार करणार आहेत. ही तक्रार महायुतीच्या नेत्यांविरोधात असणार आहे. वादग्रस्त विधान करत असल्यामुळे महायुतीची बदनामी होते. तसेच याचा फटका आगामी विधानसभेमध्ये बसू शकतो. त्यामुळे भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजित पवार गटाकडून सांगितले जाणार आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, वादग्रस्त विधानाबद्दल अजित पवार दिल्लीत काय तक्रार करणार, याची मला माहिती नाही. अजितदादा यांना ते काय तक्रार करणार याबद्दल विचारायला हवं. त्यांनी तक्रार केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी काय म्हटलं, हे पण त्यांना विचारा, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.