बीड कोचिंग क्लास लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला (फोटो - istock)
मुंबई : मागील काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आले होते. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत त्यांचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले. यामध्ये सर्वात आघाडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया होत्या. दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आरोपांची सरबत्ती लावली होती. यानंतर आता आणखी एका बीडमधील प्रकरणावरुन अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
बीडमधील उमाकिरण नावाच्या कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थींनीवर शिक्षक नराधमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपी विजय पवार, प्रशांत खाटोकर आणि अजय बचोरे यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरुन पावसाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे विधीमंडळामध्ये जोरदार टीका करण्यात आली. या प्रकरणावरुन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत एसआयटी स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीप्रमाणे एसआयटी स्थापन झाल्यानंतर आता अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, तकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली? आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे. काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाष्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात?
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही. वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रैक वर केली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही.
इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली?
आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे.
काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 2, 2025