धनंजय मुंडे अजूनही मुंबईतील शासकीय निवासात राहत असल्यामुळे अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामधील फोटो देखील समोर आले असून राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. अंजली दमानिया यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. धनंजय मुंडेंनी राजीनामा देखील दिला आहे. यानंतर आता दोषारोप पत्रावरून अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आवादा कंपनीकडून खंडणी मागितली जात असल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, आवादा कंपनीकडून खंडणी मागितली जात होती. मे महिन्यापासून खंडणीसाठी पाठपुरावा केला जात होता. त्याच दरम्यान, २८ मे रोजी कंपनीतील कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. सातत्याने खंडणी मागितली जात होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात बोलावून खंडणी मागितली. पाठोपाठ सातपुडा बंगल्यावर बोलावून खंडणीसाठी धमकावण्यात आलं. सातपुडा बंगल्यावर बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट होता की त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्याला दाखवायचं होतं की आम्ही मंत्र्याच्या बंगल्यावर बोलावून तुला धमकावू शकतो. याचा अर्थ तुला पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे यामागे धनंजय मुंडे होते की नव्हते ते देखील स्पष्ट आहे. एकदा नव्हे तर सहा वेळा अशा प्रकारे खंडणी मागण्यात आली. त्यामुळे मला वाटतं की आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं.” असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया यांनी बीडमधील हत्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा मुंडेंना घेरले आहे. त्या म्हणाल्या की, “दोषारोप पत्रातील पान ३६ वर ‘टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले’ असा उल्लेख का केलाय? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर १ वर असेल, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे. दुसरा मुद्दा – वाल्मिक कराडबद्दल लिहिलं आहे की त्यांनी ‘आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल’ असं त्याने सुदर्शन घुले याला सांगितलं आणि “कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या”. चार्जशीटमध्ये एवढंच लिहिलं आहे. हे सर्व पाहून उद्या वाल्मिक कराड म्हणेल, ‘मी कुठे त्यांना मारा असं म्हटलं?’ ही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची पळवाट आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.