अजित पवार गटाच्या पुण्यातील नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील शहराध्यक्षांसह इतर अनेक महत्त्वाचे नेते हे अजित पवार यांच्या पक्षातील काराभारवर नाराज असून त्यांना डावलले जात असल्याची तक्रार केली जात आहे. अजित पवार गटातील काही ठराविक नेत्यांना सातत्याने संधी दिली जात असल्यामुळे ही नाराजी वाढली आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर नाराजी व्यक्त करत राजीनामा देणार असल्याचे देखील घोषित केले आहे. त्याचबरोबर पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आता रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये वादविवाद देखील सुरु आहेत.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये दोन इतर नेत्यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर चाकणकर यांना देखील पुन्हा एकदा महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले. यामुळे पुण्यातील दीपक मानकर व रुपाली पाटील ठोंबरे नाराज आहेत. पुण्यातील अजित पवार गटाचे नाराज नेते आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते. यानंतर महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, “मला राज्यपाल नियुक्त आमदार केलं नाही हे मी समजू शकते, संघटना मजबूत झाली पाहिजे त्यासाठी एक पक्ष एक पद हे गणित पाहिजे असं मी दादांना देखील सांगितलं आहे. काही ठिकाणी समजूतदारपणा घ्यावा लागतो, प्रत्येकजण आपल्या राजकीय फायद्यासाठी निर्णय घेत असतो. आम्ही तक्रार दादांना सांगू शकतो, मला सांगितलं तुम्ही तुमचं काम करा. एका व्यक्ती एकच पद यासंदर्भात देखील निर्णय येत्या काळात घेऊ,” असे सांगण्यात आल्याचे मत रुपाली पाटील यांनी मांडले.
हे देखील वाचा : शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार? शेवटच्या सभेसाठी एकाच वेळेसाठी चार अर्ज
पुढे त्यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्ट मत व्यक्त केले. रुपाली पाटील म्हणाल्या की, “पक्षात मी नाराज नव्हते, मला राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारलं आहे, पण रुपाली चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते ना, त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे. एक पद-एक व्यक्ती न्याय द्यावा, त्यात रुपाली ठोंबरे पाटीलच नव्हे तर इतर महिलांना देखील पदं दिली पाहिजे. मी लोकांमधून निवडून येणारी व्यक्ती, त्यांनी स्वत:वर ओढवून घेऊ नये. त्यांना माझी अडचण काय आहे? की आम्ही सर्व महिला एकत्र येत आहे ही अडचण आहे. की आम्ही सर्व महिला एकत्र येत आहे ही अडचण आहे. मी कसबा विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होतं, मात्र 2019 साली तिकीट कापलंच होतं ना, मला त्या पक्षात नवीन आलेल्या म्हणाल्यात, मी मागच्या 19 वर्षांपासून राजकारणात काम करते आहे. आमच्यात वाद नव्हता, त्यांनी गैरसमज करुन घेतलेला आहे,” असे मत पुण्यातील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.