Kokan Vidhan Parishad Election:'बदला हा वेळेचा अपव्यय'; पक्षातून हकालपट्टीनंतर बाळ मानेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा
बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जात उमेदवारी अर्ज मागे घेतला. लक्षणीय बाब म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत मंत्री नितेश राणे हेदेखील उपस्थित होते. या घडामोडींनंतर ठाकरे गटात संताप उसळला. या प्रकारानंतर अवघ्या काही तासात तातडीने कारवाई करत बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी केली.
शिवसेना उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियाद्वारे बाळ माने यांच्यावर कारवाई केल्याची माहिती दिली. तर माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी बाळ माने यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत तीव्र शब्दांत टीका केली.
बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या दोन स्टेटसची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. बाळ मानेंनी त्यांच्या एका स्टेटसमध्ये, “मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो, त्याच दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास बाहेर पडतात” असा संदेश दिला आहे. तर दुसऱ्या स्टेटसमध्ये “Revenge is just waste of time” (बदला हा वेळेचा अपव्यय आहे) असे म्हटले आहे.
या संदेशांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. इतकेच नव्हे तर बाळ मानेंनी त्यांच्या एका दुसऱ्या स्टेटसमध्ये एम.एस. गोळवळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपूर या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात असून, बाळ माने यांच्या माघारीने कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.






