CJP Parliament March LIVE: CJPचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP Parliament March LIVE: कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) संसद मार्चदरम्यान पोहचला असतानाच दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीजेपीचा मोर्चा संसदेच्या दारात असतानाच अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याने वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
“दिल्ली पोलिसांनी आमचे सहकारी अभिजीत दीपक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रशासन शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर अत्यंत निर्घृणपणे कारवाई करत असून त्यांना मारहाण केली जात आहे,” असा गंभीर आरोप कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी केला आहे.
या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या सौरव दास यांनी देशातील विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांना तात्काळ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी खासदारांनी आता पुढे यायला हवे,” असे त्यांनी म्हटले आहे. संसद मार्च दरम्यान झालेल्या या धरपकडीमुळे जंतर-मंतर आणि संसद परिसर भागात कमालीचा तणाव वाढला आहे.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आलीआहे. आज सकाळी सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं.
सीजेपीच्या आजच्या संसद मार्चच्या दरम्यान आज मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सीजेपीच्या आजच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून विद्यार्थी जंतरमंतरवर दाखल होत आहेत. आज सकाळच्या सुमारास विद्यार्थी संसदेकडे निघाले असता पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून विद्यार्थ्यांचे रस्ते अडवले होते. यामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. यात काही विद्यार्थी जखमी झाले.
यानंतर विद्यार्थी आंदोलक दुपारच्या सुमारास संसदेच्या आवाराजवळ पोहोचलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून ‘सीजेपी’ने प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक संसदेच्या परिसरात दाखल होऊ लागले आहेत. ससंदेच्या मुख्य प्रवेश द्वारावर पोलिस आणि सैनिकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. दुसरीकडे जंतरमंतर विद्यार्थ्यांवर लाठीचार् केल्याने काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना प्रथमोपचार कऱण्यासाठी देखील कोणतीही मदत पुरवली जात नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.






