शहाबुद्दीन आणि ओसामा यांच्यावर अमित शाह यांनी बिहारमधील दौऱ्यावर जोरदार टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
Bihar elections 2025: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजपने बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत. जोरदार प्रचार सुरु असून सभा आणि रॅली सुरु आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील जोरदार प्रचार सुरु केला आहे. अमित शहा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सिवान येथे एका जाहीर सभा घेतली. त्यांनी लालू यादव आणि राबडी देवी यांच्या राजवटीचे वर्णन “जंगल राज” असे केले. त्यांनी माजी खासदार शहाबुद्दीनचा मुद्दा उपस्थित करत ओसामाला निवडणूक जिंकू न देण्याची शपथ घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर सभा घेतली. सिवान येथे लाखो समर्थकांसह अमित शाह यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पहिल्यांदाच सिवानमधील लोकांशी संवाद साधण्यासाठी सिवान येथे आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लालू यादव आणि राबडी देवी यांचे ‘जंगल राज’ – शाह
अमित शाह यांनी लालू यादव आणि राबडी देवी यांच्या राजवटींची आठवण करून दिली. ते म्हणाले की, लालू यादव आणि राबडी देवी यांच्या २० वर्षांच्या ‘जंगल राज’ दरम्यान सिवानला माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या दहशतीचा, अत्याचारांचा आणि हत्यांचा सामना करावा लागला. यावेळी सिवानची भूमी रक्ताने माखली होती, परंतु सिवानच्या लोकांनी झुकण्यास नकार दिला आणि ‘जंगल राज’ संपवला, असे म्हणत अमित शाह यांनी बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जंगलराज शब्द वापरला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील एनडीए सरकारच्या कामगिरीचीही यादी केली. त्यांनी सांगितले की, एनडीए ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. बिहारला जंगल राजपासून मुक्त करणे हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे योगदान आहे यावर त्यांनी भर दिला.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
ओसामाला जिंकू देणार नाही: शाह
अमित शाह यांनी आरजेडीवर हल्लाबोल करताना म्हटले की, लालू यादव यांनी पुन्हा एकदा शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा याला रघुनाथपूरमधून तिकीट दिले आहे. त्यांनी सिवानच्या लोकांना आश्वासन दिले की, “आता मोदीजी आणि नितीशकुमारजी सत्तेत आहेत, जरी शंभर शहाबुद्दीन आले तरी कोणाच्या केसालाही इजा होणार नाही.” त्यांनी ओसामाला जिंकू देणार नाही आणि शहाबुद्दीनच्या विचारसरणीला थारा देऊ देणार नाही अशी शपथ घेतली. १४ नोव्हेंबर रोजी “खरी दिवाळी” साजरी होईल, जेव्हा लालूंचा मुलगा नष्ट होईल, असे भाकीत शाह यांनी केले होते.
शाह यांनी २० वर्षांचा हिशोब मागितला
शाह यांनी २० वर्षात लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या विकासकामांचा हिशोब मागितला. विकास झाला नसला तरी, लालू यादव चारा घोटाळा, नोकरीसाठी जमीन घोटाळा, रेल्वे हॉटेल घोटाळा, बीपीएससी भरती घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता यासारख्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी घुसखोरांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी म्हणतात की घुसखोरांना बिहारमध्ये राहू दिले पाहिजे. शहा यांनी जनतेला विचारले की घुसखोरांना देशातून हाकलून लावावे आणि मतदार यादीत समाविष्ट करावे का. शहा यांनी आश्वासन दिले की जर एनडीए सरकार पुन्हा निवडून आले तर त्यांचे सरकार “प्रत्येक घुसखोराला देशातून एक एक करून हाकलून लावण्याचे काम करेल.” असा घणाघात अमित शाह यांनी केला आहे.






