मुस्लीम महिला मुंबईचा महापौर होण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
BMC Elections 2026 : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल हाती येणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार यावरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर होणार असल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महापौर मराठीच झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना-मनसेकडून केली जात आहे. तर हिंदू महापौर भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल,” अशी इच्छा वारिस पठाण यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होणार का यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका! प्रचार गीतातील एका शब्दाने निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जेव्हा वारिस पठाण यांनी हे सांगितले तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही; त्यांनी तोंडाला कुलूप घातले. पण मी पुन्हा एकदा सांगतो की मुंबईचा महापौर एक हिंदू, एक मराठी असेल.” अशी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
माझा लढा मुस्लिमांशी नाही – फडणवीस
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझा धर्म प्रत्येक धर्माचा आदर करतो. माझ्या धर्मात कुठेही इतर धर्माच्या लोकांविरुद्ध जिहाद पुकारण्याचे म्हटलेले नाही. माझ्या धर्मात जिहाद अस्तित्वात नाही. मी कधीही सर्व मुस्लिमांना दोष देत नाही. जे या देशावर प्रेम करतात ते देखील मुस्लिम आहेत. माझा लढा त्या मुस्लिमांशी आहे जे भारतात राहतात आणि वंदे मातरम म्हणत नाहीत. जे या देशात राहतात पण ते या देशाला स्वतःचे मानत नाहीत, असे मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
काय म्हणाले होते वारिस पठाण?
अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौर पदाबाबत वारिस पठाण यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, “जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकतं? आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल. मला एक सांगा की, मी महादेवावर प्रेम करतो, असे वक्तव्य करणारी व्यक्ती जर महापौर होऊ शकते तर मग हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला का महापौर होऊ शकत नाही? असे मत एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी व्यक्त केले.






