छावा चित्रपट महाराष्ट्रामध्ये करमुक्त करण्याची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मागणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट देशभरामध्ये धुमाकूळ घातल आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून अभिनेता विकी कौशलच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. दरम्यान, छावा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी समोर येत आहे. याबाबत कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. छावा चित्रपटाबाबत मत मांडताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छावा चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. त्याला सगळे संदर्भ आहेत. ही कादंबरी एक ठेवा आहे. या कादंबरीवर चित्रपट असेल तर त्यावर कुठलाही आक्षेप नोंदवण्याची गरज नाही. मी काँग्रेसतर्फे हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती शासनाला केली होती. पण त्यावर काही झाले नाही असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि चिटणीस यांची बखर यात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. या बदनामीचा समर्थन म्हणून फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाही,” असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुण्यामध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कॉंग्रेस नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर गैर काय? माझे त्यांच्याशी बोलणे झाले, ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. बेळगावसह इतर गावांसंदर्भात महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जुना वाद आहे. यावर तोडगा निघाला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे,” असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “छावा’ सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण, मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायतंय की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात, तेव्हा जो करमणूक कर असतो, तो माफ केला जातो. महाराष्टानं 2017 सालीच यासंदर्भातला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमीकरिता रद्द केला. आपल्याकडे करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही.”, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.