नाशिक, संभाजीनगर, पुण्याचा तिढा कायम: विधान परिषद जागावाटपावर फडणवीसांचे सूचक विधान
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “तीन मोठे राजकीय पक्ष एकत्र निवडणूक लढवत असताना प्रत्येक पक्ष आपापल्या मजबूत जागांवर दावा करतो, हे स्वाभाविक आहे. मात्र, याचा अर्थ महायुतीमध्ये फूट आहे असा होत नाही.”
जागावाटपााबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या जागांवर चर्चा सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांचे प्रभावी अस्तित्व आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पुणे जागेबाबत चर्चा सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र बसून लवकरच सकारात्मक तोडगा काढतील आणि विजय निश्चित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीबरोबरच फडणवीस यांनी राज्यातील इंधन संकट आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरही भाष्य केले. “सध्या जागतिक स्तरावर गंभीर भू-राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर होत आहे.” असं त्यांनी नमुद केलं.
“अनेक देशांमध्ये इंधन आणीबाणी आणि अंशतः टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र सरकार राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा कायम ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे,” असे फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांना इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर नियमित आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात इंधनटंचाई निर्माण होईल या भीतीमुळे नागरिक घाबरून मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने मागणीत अचानक २० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर कोणत्याही डीलर किंवा मध्यस्थाने अवैध इंधन साठेबाजी करू नये, असा कडक इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल पंपांवर अचानक तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
राज्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अतिरिक्त इंधन साठवू नये, असे आवाहन करताना फडणवीस म्हणाले, “राज्याचा एकूण इंधन कोटा गेल्या वर्षीइतकाच आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.”
पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, अफवा पसरवणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






