अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण; पण आता 'या' गोष्टीमुळे वाढली प्रशासनाची डोकेदुखी (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. या मतदानानंतर स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे जमा केलेल्या ईव्हीएम मशीनची सुरक्षा निवडणूक आयोग आणि सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
अनेक ठिकाणी स्ट्राँग रूमबाहेर मंगळवारी रात्रीपासून गोंधळाचे वृत्त समोर आले आहे. आंदोलक ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत असून मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप करत आहेत. सांगलीतील आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रणित नागरी विकास आघाडीने वाढलेल्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास २००० मतांची तफावत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला
दरम्यान, आंदोलकांचा दावा आहे की, प्रभाग क्रमांक ३ मध्ये एकूण १३११ मतदार आहेत. परंतु, प्रत्यक्ष मतदान ४,०७७दाखवण्यात आले आहे. यापैकी ३,१०९ लोकांनी मतदान केल्याचे सांगण्यात येत असल्याने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमबाहेर जोरदार निदर्शने केली.
स्ट्रॉग रूमच्या बाहेर थांबू देण्याची मागणी
परळी नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी स्ट्रॉग रूमच्या बाहेर थांबू देण्याची एक अनोखी मागणी केली. १७ दिवसांच्या प्रतीक्षेत ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होतील. त्यापूर्वी काही भागात २० डिसेंबरला मतदान होणार आहे. विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
एलसीडीद्वारे प्रक्षेपण करा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी आष्टा येथे भेट देत स्ट्राँग रुमची पाहणी केली. महाराष्ट्रातील सर्वच मतदान केंद्र आणि ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या आत व बाहेर कॅमेरे लावावेत. तसेच, एक मोठा डिस्प्ले लावून एलसीडीच्या माध्यमातून प्रक्षेपण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ईव्हीएमची सुरक्षा पोलिसांवर
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीतील मतमोजणी थांबविल्यामुळे ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्ट्रॉग रूममध्ये साठवलेल्या सर्व मतदान यंत्रे पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे, स्ट्रॉग रूम परिसरात चोवीस तास कडक पहारा ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे. मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे मंचरमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.






