Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; अर्ज माघारीनंतरच होणार चित्र स्पष्ट
म्हसवड : म्हसवड पालिका निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज पालिकेत दाखल केल्याने इच्छुकांनी शंभरी पार केली होती. मात्र, अर्ज छाननीत किती जणांचे अर्ज होणार यावर पुढील चित्र स्पष्ट होणार असून, थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीत आता पाच महिला निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या आहेत. तर ४ महिलांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
म्हसवड पालिकेची पंचवार्षीक निवडणुक २ डिसेंबर रोजी संपन्न होत असून या निवडणुकीची प्रक्रिया पालिका सभागृहात सध्या सुरु आहे. पालिका निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या दिवशीच अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा आकडा शंभरी पार गेला, तर नगराध्यक्ष पदासाठी ही अनेक महिला इच्छुक असल्याने ही संख्या ही दोन आकड्यात गेली होती.
दरम्यान, मंगळवारी (दि.१८) उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी पालिका सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी मीना बाबर व सह निवडणूक अधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या समोर घेण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या ९ उमेदवारांच्या १२ अर्जाची छानणी करण्यात आली. यामध्ये सुवर्णा सुनील पोरे, प्राजकता शुभम पोरे, जयमाला विशाल विरकर, कांता शंकर विरकर या भाजपच्या महिला उमेदवारांचे अर्ज पक्षाचे अधिकृत जोडपत्र नसल्याने ते अवैध ठरवण्यात आले. तर पूजा सचिन विरकर (भाजप), भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), रुपाली वाल्मिक सरतापे (बहुजन समाज पक्ष), तर गौरी विशाल माने व हिंदमालादेवी राजेमाने या दोन अपक्ष महिलांसह एकूण ५ महिलांचे अर्ज वैध ठरले आहेत.
हेदेखील वाचा : भाजप शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती; निर्णयाचं होतंय स्वागत
उमेदवारी अर्ज छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही २१ नोव्हेंबर ही असून, यानंतरच नगराध्यक्षपदाच्या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पालिका सभागृहात उमेदवारांचे अर्ज छाननी ही अतिशय संथ गतीने मात्र काटेकोरपणे सुरु असल्याने एका प्रभागाची छाननी करण्यासाठी किमान एक तास लागत आहे. यामुळे छाननी प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.






