तळेगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश (संग्रहित फोटो)
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या स्थानिक अडीचशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी बालाजी मंगल कार्यालयात प्रवेश केला. आमदार सुमित वानखडे यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाथे यांच्या उपस्थितीत हे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांत सूरज पिठेकर, विनोद डोंगरे, नीलेश बोधनकर, सुनील धोटे, विजय सोनटक्के, नीलेश पटले, मयंक खेरडे यांच्यासह शेकडो तरुणांचा समावेश होता. तळेगावच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा पक्षप्रवेश मानला जात आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात या राजकीय घडामोडीचे भविष्यात पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेली ही तरुणांची मोठी इन्कमिंग पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या तरुणांची फळी भाजप तालुकाध्यक्ष सचिन होले यांच्या नेतृत्वात काम करणार आहे.
प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य उपयोग
यावेळी आमदार वानखडे म्हणाले, ‘आर्वी विधानसभा मतदारसंघाचा सातत्यपूर्ण विकास होत आहे. या विकासयात्रेत सहभागी होताना मी आमदार म्हणून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुमच्या प्रत्येकाच्या क्षमतेचा योग्य वापर होईल, याची काळजी मी घेईन’.
काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ
एकेकाळी तळेगावात काँग्रेसच्या प्रवेश सोहळ्याने गाजावाजा केला होता. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने तरुण आता भाजपकडे वळल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा सुरू आहे.
भंडाऱ्यातही काँग्रेसला धक्का
भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांचे खंदे समर्थक माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शनिवारी (दि. १३) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादीच्या एका गटाची ताकद वाढली आहे.