कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर साधला निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
कराड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप, महायुतीला मोठे यश मिळाले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही माझा मोठा विजय झाला. येथील जनतेने मला स्वीकारल्याचा मनस्वी आनंद आहे. परंतु, आता या विजयानंतर काँग्रेसमधील अनेक मोठे नेते माझ्या संपर्कात असून मी त्यांना तूर्तास आहे तिथेच थांबण्याचे सांगितले आहे. ते भाजपमध्ये आल्यास विरोधी नेत्यांकडे कोणीही राहणार नाही, अशी खोचक टीका कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कराड दक्षिण मतदारसंघासह तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले,आमदारकीच्या शपथविधीनंतर कराड दक्षिणमधील भाजप व मित्र पक्षांसह विरोधी ग्रामपंचायत आणि नगरपालिका येथील पदाधिकाऱ्यांना बोलावून प्रलंबित कामे व नवीन विकासकामांबाबत प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे अनेकजण मला भेटत आहेत. कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टार दर्जा मिळवण्यासह याठिकाणी मिनी एमआयडीसी करण्याच्या संदर्भात माझे प्रयत्न आहेत. यादृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. कराडच्या जुन्या एमआयडीसीमध्ये सध्या असलेल्या उद्योजकांची बैठक घेऊन त्यांच्याकडून त्याठिकाणच्या समस्या जाणून घेणार आहे. याठिकाणी 1300 जणांना रोजगार मिळेल. नवीन उद्योग कराडला येण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले कराड विमानतळ विस्तारीकरणही आपण समन्वयातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असा विश्वास आमदार अतुल भोसले व्यक्त केला आहे.
पाटणा कॉलनीतील जमिनींबाबत प्रस्ताव
पुढे आमदार भोसले म्हणाले, पाटण कॉलनीतील झोपडपट्टीच्या जमिनीवरील पार्किंगची लँड परमिशन चेंज करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला असून त्यास त्यांनी तात्काळ मान्यता दिली आहे. त्यामुळे आता याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेपेक्षा दर्जेदार घरे निर्माण करून येथील लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहे. परंतु, पन्नास वर्षे घरात सत्ता असतानाही येथील लोकप्रतिनिधींना त्यांच्या घराशेजारील झोपडपट्टीचे पुनर्वसन करता आले नाही, अशी टीकाही त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वाहतूककोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना
त्याचबरोबर कराड शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “पुणे – बंगळुरू महामार्गावरील पंकज हॉटेलपासून नदीकाठी असलेल्या गॅबियन भिंतीलगत नेकलेस रोड तयार करून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. टेंभू योजनेचे पाणी अडवल्यामुळे त्याचा फुगवटा जवळपास वारुंजीपर्यंत जात असल्याने पाणी दूषित होते. यासाठी वारुंजी येथे नदीवर प्रलंबित असणाऱ्या बंधाराचे काम मार्गी लावून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कराड शहरात धार्मिक पर्यटन वाढणार
आमदार डॉ. भोसले म्हणाले, “कराडमधील वीर मारुती मंदिर, कृष्णामाई मंदिर, ज्योतिबा मंदिर व अन्य महत्वाच्या मंदिरांचेही जतन व संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे. या माध्यमातून आपण मंदिरांना क वर्ग व ब वर्ग दर्जा देऊन कराडच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच येथील उत्तरालक्ष्मी मंदिराचा प्रश्न संवेदनशील असून दोन्ही समाजाशी आपण समन्वयातून चर्चा करून कोणत्याही प्रकारे वाद विवाद न होता हा प्रश्न मार्गी कसा मार्गी लावता येईल,” यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार अतुल भोसले यांनी सांगितले.