पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपली; जैन संघटनेचा मुरलीधर मोहोळांवर आरोप
Pune Jain Boarding Land: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर विक्रीवरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जैन बोर्डिंग हाऊसची जमीन गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्यात आली असून यात मुरलीधर मोहोळांचीही भागीदारी असल्याचा आरोप जैन समाजाकडून कऱण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या दोन सहकारी बिल्डरांना जैन समाजाची जागा हडपल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
Uddhav Thackeray: “तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?
या प्रकरणी जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत आज (१७ ऑक्टोबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पण त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातहस्तक्षेप करत जैन समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पण मुरलीधर मोहोळ यांनी अद्याप या आरोपांवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मुरलीधर मोहोळ आज काही नियोजित कार्यक्रमांसाठी दिल्लीला जाणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यातच त्यांचा दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, या आरोपांवर मुरलीधर मोहोळ काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
दुसरीकडे , जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदेशीर जमीन विक्री व्यवहारावरुन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच आमदार रोहित पवार यांनीही एक पोस्ट शेअर करत मोहोळ यांच्या वर निशाणा साधला आहे. ” पुण्यात जैन समाजाच्या होस्टेलची जागा हडपली गेल्याने जैन समाजाने मोठा मोर्चा काढला आहे. दोन तीन लोकांचा नफा महत्वाचा की जैन समाजाच्या भावना महत्वाच्या हे सरकारला ठरवावेच लागेल. मीडियाने या प्रकरणाला प्रखरपणे कव्हरेज देऊ नये म्हणून सर्व मिडिया हाउसेसला अप्रत्यक्षरित्या मेसेज देण्यात आल्याचे समजत आहे. मीडियावर असा दबाव आणणे कितपत योग्य आहे? ही महाराष्ट्राची स्वाभिमानी मिडिया आहे, हे मेसेज देणाऱ्यांनी विसरू नये.” अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
पुण्यातील जैन बोर्डाची जमीन विकण्याच्या व्यवराहामध्ये मुरलीधर मोहोळ यांचाही सहभाग आहे, मोहोळ आणि बिल्डर यांना यांनी संगनमताने ही जागा विकली. या प्रकरणात जो जो आडवा आला, त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी दिला. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले असले तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.
“आम्हाला केवळ आश्वासनं नकोत. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्री व्यवहार रद्द झाल्यानंतरच आम्ही विश्वास ठेवू. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. दिवाळीनंतर या जमीनविक्री व्यवहाराला स्थगिती देण्याचा आदेश घेऊनच मुख्यमंत्री पुण्यात यावेत. त्यांनी तसे केले, तर आम्ही त्यांचा सत्कार करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजीनगर येथे असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेवरून तीव्र वाद निर्माण झाला आहे. या परिसरात दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन अशी दोन वसतिगृहे आहेत. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहांची उभारणी केली होती.
अलीकडच्या काही महिन्यांत या जागेवर नवीन विकास प्रकल्प राबविण्याच्या विश्वस्तांच्या प्रस्तावामुळे वाद निर्माण झाला. काही समाजबांधवांनी या विकास योजनेला विरोध दर्शवला होता. मात्र, अलीकडेच ही जागा परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे.
समाजाच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या जमीनविक्रीस मंजुरी देताना संबंधित नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले. तसेच या व्यवहारात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असून, त्या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.