मतदार याद्यांमधील फेरफार संदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी निवडणूक प्रक्रियेत फेरफार आणि घोळ होत असल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले होते. त्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.
या संदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत. राज्यातील मतदार यादीत झालेले घोळ दाखवण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते इथे आले आहेत. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी दाखवून दिल्या, राज ठाकरेंनीही अनेक उदाहरणे दाखवून दिली. आम्ही पुरावे दिले. निवडणूक यादीत मोठा घोळ दिसत आहे. १ जुलैची ही यादी फ्रिज करून या यादीवर निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ सुरू राहील. या याद्यांवर आम्ही हरकत घेतली आहे. आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या शंकांचं निरसन करायला हवं,अशी आमची मागणी आहे. त्यामुळे उद्या चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त आमचं म्हणणं ऐकून घेतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली.
राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी याद्या दुरुस्त केल्या पाहिजे. ११७ वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला ४० वर्षाचा मुलगा हे लॉजिकमध्ये बसत नाही. घराचे नाव नाही. पत्ते नाही, एकाच घरात अनेक लोक राहताना दिसत आहे, असा निशाणा जयंत पाटील यांनी धरला. या याद्या दुरुस्त व्हाव्यात, चुकीच्या पद्धतीने टाकलेली नावं वगळण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Priyank Kharge on RSS: RSSबंदीच्या मागणीनंतर धमक्या, शिवीगाळ करणारे कॉल्स…; प्रियांक खर्गेंचा पुन्हा
“मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी, घोळ आणि दोष आहेत. या याद्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी आमची मागणी आहे. आमचे माजी आमदार अशोक पवार यांनी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीविषयी माहिती मागितली असता, शिरूरच्या निवडणूक अधिकाऱ्याने उत्तर दिलं की मतदारांची माहिती ही गोपनीय व व्यक्तीगत आहे, त्यामुळे ती इतरत्र प्रसिद्ध केली जाणार नाही. हे अत्यंत चिंताजनक आहे.”
पाटील म्हणाले, “आमचं म्हणणं निवडणूक आयुक्त आणि चोक्कलिंगम ऐकणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक होणार असून सर्व नेते त्यात सहभागी होतील. व्हीव्हीपॅट प्रणाली लागू करावी ही आमची मागणी आहे, मात्र आयोगाने त्याला नकार दिला. या विषयावरही उद्या सविस्तर चर्चा केली जाणार आहे.”
“सीसीटीव्ही कॅमेरे देशभरात सर्वत्र बसवले गेले आहेत, परंतु काही ठिकाणी प्रायव्हसीचा भंग झाला आणि बुथ कॅप्चरिंगच्या घटना समोर आल्या. सध्या कोणत्याही मतदारसंघाचं नाव घेणार नाही, पण उद्या बैठकीनंतर या विषयावर पत्रकार परिषद घेण्यात येईल,” असेही जयंत पाटील म्हणाले.
देशातील निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केली. “केरळ, बंगाल आणि कर्नाटकात भाजपही याच मागणीसाठी आवाज उठवत आहे. त्यामुळे या विषयावर भाजपने आमच्यासोबत राहावे, असे आमचे म्हणणे आहे. हा कोणताही राजकीय शिष्टमंडळाचा भाग नाही, तर निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, यासाठी केलेला प्रयत्न आहे,” असे राऊत म्हणाले.
चोक्कलिंगम यांच्याशी संबंधित काही निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे सांगून राऊत म्हणाले, “उद्या निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीला चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे उपस्थित राहणार आहेत. आजची चर्चा अपुरी राहिल्याने उद्या पुन्हा चर्चा होईल. बैठकीसाठी दुपारी १२ वाजता वेळ कळवली जाईल.”