File Photo : Vidhan Sabha
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर विरोधी महाविकास आघाडीला 50 जागाही मिळवता आल्या नाहीत. त्यात विरोधी पक्षनेता होईल इतक्या आमदारांचे संख्याबळही कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आम्हाला घावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रविवारी केली.
हेदेखील वाचा : विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा असू शकतो विरोधी पक्षनेता; काय सांगतो नियम?
तसेच विधानसभा उपाध्यक्षपदही विरोधी पक्षांना द्यावे, अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला असून, विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी दहा टक्के देखील आमदार महाविकास आघाडीचे निवडून आले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नसल्याची परिस्थिती आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते पदाची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामध्ये भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे नेते उपास्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावे असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आहे.
संविधान हातात घेऊन घेतली शपथ
काँग्रेसच्या नाना पटोले, डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संविधान हातात घेऊन विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
288 पैकी 280 आमदारांनी घेतली शपथ
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा निवडणूकित नवनिर्वाचित 280 आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उर्वरित आठ जण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार सत्तेत आले आहे, त्यानंतर शनिवारपासून विधासभेचे विशेष अधिवशन बोलावण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पडला.
विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, मान-सन्मान मुख्यमंत्र्यांसारखेच
विरोधी पक्षनेतेपदाचे हे घटनेने दिलेले पद आहे. राजकारणात विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष असते. जेवढे अधिकार व मान सन्मान मुख्यमंत्र्यांना असतो, तेवढाच या पदाला असते. सभागृहात विरोधी पक्षनेते उभे झाल्यास विधानसभाध्यक्षही त्यांना प्राधान्य देतात.
यंदाचा कौल विरोधी पक्षनेता ठरवू शकत नाही पण…
यावेळी निवडणुकीत मिळालेला कौल हा विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही. परंतु, यासाठी विधानसभा अध्यक्षांची मर्जी असेल व निर्णय घेत असतील तरच विरोधी बाकाला नेता मिळू शकतो. अन्यथा, प्रत्येक गटनेत्यांवर त्या पक्षाची जबाबदारी अवलंबून असेल.
हेदेखील वाचा : ‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य