महायुती सरकारमधील 'या' मंत्र्याचे पद धोक्यात (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन पुन्हा एकदा महायुती सरकार आले आहे. सरकार स्थापन होऊन दोन महिने झाल्यानंतर देखील पालकमंत्री जाहीर होत नसल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर काल (दि.18) रात्री उशीरा पालकमंत्री पदाची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मागील महायुती सरकारमध्ये पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या संधी नाकारल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये नाराजीचा अक्षरशः पूर आला आहे. महायुतीमध्ये जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री अशा सर्वच निर्णयानंतर अनेक नाराज नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री पद जाहीर होताच अनेकांना संधी न मिळालेल्या मंत्र्यांनी आपली नाराज व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे. शिंदे गटातील अनुभवी नेत्यांना संधी नाकारल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही नेत्यांवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मला तिसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी व मान मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालं आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मागील पाच वर्षे या जिल्ह्यात तीन मंत्री होते. परंतु, पालकमंत्रिपद माझ्याकडे होते. या काळात माझ्या हातून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील. परंतु, विकासकामे बघून मला ही संधी दिली आहे,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्य़वाद मानले आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे त्यांनी शिंदे गटाचे नेते दादा भुसे व भरत गोगावले यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली. गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्ही तिन्ही मंत्री मिळून जिल्ह्याचा विकास करणार आहोत. आमच्यामध्ये कोणतीही रस्सीखेच नव्हती. मात्र, मंत्री दादा भुसे व भरत गोगावले यांना नक्कीच पालकमंत्रिपद मिळायला हवं होतं. तशी आमची इच्छा होती. त्यांच्यावर निश्चितच अन्याय झाला आहे,” असे स्पष्ट मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिंदे गटाचे दोन्ही नेते दादा भुसे व भरत गोगावले यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्री विभाग तर फलोत्पादन तथा रोजगार हमी मंत्री म्हणून भरत गोगावले यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. मात्र मंत्रिमंडळामध्ये असून देखील कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आलेले नाही. दादा भुसे हे नाशिकचं पालकिमंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. मात्र जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचं पाकलमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर, भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद हवं होतं. फडणवीस सरकारमध्ये रायगडची जबाबदारी महिला व बाल कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे.