आगामी पालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार
मुंबई : नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी तळागाळातील कार्यकर्ते तयार आहेत. ‘आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत’, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
सुनील तटकरे यांनी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. तटकरे म्हणाले, ‘आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत. पुढील तीन दिवसांत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. महायुती समन्वय समितीची बैठक पुढील मंगळवारी होणार आहे. या बैठकीत महायुती म्हणून नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुका लढवण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात येईल. राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज मागवले आहेत. अर्जाची संख्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र उत्साह दर्शवते’.
तसेच रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेने (उबाठा) ची युती होणार असल्याच्या अटकळामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचा असा विश्वास आहे की, अशी युती अनावश्यक आहे. परंतु, राष्ट्रवादी ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. तटकरे यांनी सावध भूमिका घेत सांगितले की, युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगावर टीका
भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजप व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत, हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे पुरावे देऊन निवडणूक आयोगाला उघडे पाडले. पण ‘निर्लज्जम सदा सुखी’ या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली बनले आहे, असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.






