खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांना निशाण्यावर धरुन आणि धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण भारतातून या घटनेच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून देखील या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधाक कठोर भूमिका घेतली जात आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
काय म्हणाले खासदार राऊत?
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, “पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये. राजकारण कोण करतंय, भाजपच्या अनेक संस्था संघटना समाजमाध्यमांवर याचं राजकारण करत आहेत. हा हल्ला झाल्यावर २४ तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता,” अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केली आहे. युट्युब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राऊत म्हणाले की, “जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. एक सैनिक किंवा नागरिक मारला गेला तर अमेरिका, इस्त्रायल आणि रशियासारखी राष्ट्र जी स्वत:ला बलवान समजतात किंवा 56 इंचाची छाती वाले समजतात. ते ताबडतोब प्रत्युत्तर देतात. आम्ही पाणी बंद केलं, पण पाणी असं बंद होत नाही. त्यासाठी मोठमोठे बंधारे, धरणं बांधावी लागतील, 20 वर्षांनी जेव्हा ती धरणं उभी राहतील, तेव्हा ते पाणी बंद होईल. आम्ही पाकिस्तान 27 युट्यूब चॅनल बंद केली, याला बदला म्हणतात का?” अशा शब्दांत संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “त्यासोबतच 4PM नावाचे एक युट्यूब चॅनल बंद केलं. कारण हे चॅनल मोदी-शाहांच्या धोरणावर टीका करते. गेले ७ दिवस मोदींचे विविध फोटो आम्ही पाहतोय. ते सैन्य अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सरंक्षण मंत्री यांच्यासोबत ते बैठक घेतात, त्याबद्दल चर्चा करतात. त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानावर हल्ला करण्याचे ठरवले, तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल मानेक शॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीत. त्यांच्याशी युद्ध करायचं तुमची काय तयारी आहे. तुम्ही तयार आहात का, जनरल मानेक शॉ म्हणाले आम्हाला ८ दिवस द्या. यानंतर ८ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला. त्यांचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला याला राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात” असे म्हणत संजय राऊत यांनी इंदिरा गांधींच्या रणनीतीची आठवण करुन दिली आहे.