वीर सावरकर यांची पदवी परत आणण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांचे एकमत झाले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्रा‘च्या उदघाटनाचा सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सावरकरांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विनायक सावरकर यांची बॅरिस्टर पदवी परत आणण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचे शिवसेना ठाकरे गटाने स्वागत केले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “हे स्वागतहार्य गोष्ट आहे. वीर सावरकर यांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली, ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा आपला ठेवा आहे. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधील राहतं घर सरकारने ताब्यात घेतलं आणि तिथे मेमोरियल केलं. आम्ही त्याचं स्वागत करतो आणि केलं. वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली ते आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केली बॅरिस्टर ही पदवी आणि त्याला कोणी विरोध करण्याचे कारण नाही. पण खरी पदवी आणा,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त चर्चेमध्ये आला आहे. संजय राऊत म्हणाले की, “वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच, तो कागदाचा तुकडा जरी ब्रिटिशांनी जप्त केला असला तरी आम्ही त्यांना बॅरिस्टर मानतो. पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आहे. काल सुद्धा दिल्लीमध्ये पद्म पुरस्कारांचा सोहळा झाला. आम्हाला वाटत होतं या वेळेला तरी सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे. आम्ही किती वाट पाहायची? बाकी तुम्ही पदवी आणालं, त्यांचे कपडे आणालं, त्यांची टोपी आणालं. सर्व काही आणलं. पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे, त्यांच्या विचारधारेच्या तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीका कारांची तोंड बंद करण्यात आहे,” अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ते शिफारस का केली नाही आणि मोदी आणि शाहांनी त्यांच्या पूर्ण हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? बॅरिस्टरची पदवी आणाल, समुद्रात जिथे उडी मारली तिथे तुम्ही डोक टेकाल, वर्षानुवर्ष आम्ही करत आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाही. स्वातंत्र्यवीर ही त्यांना सर्वोच्च पदवी महाराष्ट्राने दिली. वीर ही पदवी मोदी, शाह यांनी किंवा भाजपने दिलेली नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने त्यांना दिली. महाराष्ट्राने वीर सावरकर यांचा सन्मान केला आणि तुम्ही राजकारण करता,” असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.