भांडुपनंतर रेल्वे प्रवासादरम्यान पुन्हा हल्ला; लोकलमधून तिघांना धावत्या रेल्वेतून ढकलले
मुंबई : मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर झटापटीत झाले. या झटापटीच्या घटनेत तीन तरुण थेट रेल्वे रुळावर पडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. रुळांवर पडलेल्या एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे.
तीन तरुण कुर्ला रेल्वे स्थानकातून सकाळी सुमारे ९.४० वाजताच्या सुमारास कल्याण-सीएसएमटी धीम्या लोकलमध्ये चढले होते. प्रवासादरम्यान कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे झटापटीत झाले. झटापटीत सायन रेल्वे स्थानकात लोकलमधून तिघेही खाली व रुळावर पडले. लोकलमधून तरुण खाली पडल्याचे लक्षात येताच खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा सुमारे ९ मिनिटांसाठी बंद केला. त्यामुळे त्या मार्गावरील लोकल वाहतूक थांबवण्यात आली. रुळावर पडलेल्या तरुणांना कोणतीही जीवितहानी होऊ नये आणि तात्काळ वैद्यकीय मदत देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
सायन रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या घटनेनंतर ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा सुमारे नऊ मिनिटांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे अप-डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा तात्पुरती खोळंबली. सकाळची गर्दी असल्याने लोकल थांबल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. काही वेळ लोकलमध्येच प्रवाशांना थांबावे लागले, तर स्थानकांवरही गर्दी वाढली.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
जखमींपैकी अफझल चौधरी (वय ३६, रा. गोवंडी, मुंबई) यांची प्रकृती गंभीर असून सचिन विश्वकर्मा (वय २१, रा. नालासोपारा, ठाणे) आणि जैनिल सय्यद (वय २५, रा. कुर्ला, मुंबई) यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सकाळी सुमारे १०.४३ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अद्याप कोणाचाही जबाब नोंदविण्यात आलेला नसून, नेमक्या कारणांचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
भांडण की लोकलची गर्दी?
सायन स्थानकादरम्यान घडलेल्या घटनेत प्रवासी नेमके कशामुळे खाली पडले, याचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. गर्दीच्या रेट्यामुळे तोल जाऊन प्रवासी पडले की डब्यात झालेल्या भांडणातून झटापट होऊन ही घटना घडली, याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने भांडणातून झालेल्या झटापटीमुळे प्रवासी खाली पडल्याचा दावा केला आहे. मात्र, नेमके कारण काय याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.
हेदेखील वाचा : Ahilyanagar News: नगराध्यक्षांच्या दालनाचा ताबा घेतल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांसह 17 जणांवर नेवासेत गुन्हा दाखल






