महायुती सरकारचा शपथविधी (फोटो- टीम नवराष्ट्र)
नागपूर : राजशिष्टाचार व शिस्तीचे प्रतिक असलेल्या राजभवनाने प्रथमच शपथविधी समारोहात वेगळाच अनुभव घेतला. आजवरच्या इतिहासात राजभवनातील शपथविधी सोहळ्याला झालेली मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी अन् घोषणांसह वाजलेल्या शिट्ट्या अनेकांचे लक्ष वेधून घेत होत्या. असा प्रकार प्रथमच झाला असून, नागपूरच्या राजभवनाने 33 वर्षांनंतर शपथविधीला मोठी गर्दी अनुभवली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! उधारी मागितल्याने डोक्यात दगड घालून केला तरुणाचा खून; पोलिसांनी 24 तासांत लावला छडा
राजभवनातील शपथविधीला केवळ निमंत्रित पाहुणे असतात. परंतु, नागपुरातील राजभवनाने मोठी गर्दी अनुभवली. मोठ्या संख्येत सबंध राज्यातून मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांचे कार्यकर्ते व समर्थक शपथविधीला हजर होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंत्र्यांचे नाव पुकारल्यानंतर समर्थकांकडून घोषणाबाजी होत होती. यामुळे काही वेळा अडथळाही आला. काही कार्यकर्ते एवढे उत्साही होते की त्यांनी शिट्टयाही फुंकल्या. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येवर नागपुरात 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यातील 38 जणांनी ईश्वरसाक्ष मानून मराठीतून शपथ घेतली. मात्र, भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.
मंत्र्यांकडूनही प्रतिसाद शपथविधीपूर्वी मंत्र्यांना
व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. एकेक मंत्री येत असतानाच मंत्रिमंडळात कोण, याचा उलगडा होत होता. यातील अनेकांनी व्यासपीठावर येताच आपल्या कार्यकर्त्यांना हात दाखवत प्रतिसाद दिला. त्यावेळीही समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही मंत्री आपले समर्थक शोधत होते. दिसताच त्यांना हात दाखवून आपला आनंद व्यक्त करीत होते.
गोगावलेंना सर्वाधिक टाळ्या
शपथविधी सोहळ्यात सर्वाधिक टाळ्या शिंदे सेनेचे भारत गोगावले यांना पडल्या. कायम पांढरा शुभ्र टॉवेल अशी ओळख असलेले गोगावले यांनी शपथ घेण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आदींना वंदन करून शपथ घेतली. राज्यपालांनी ‘मी’ पुकारण्यापूर्वीच त्यांनी वंदन केले. तर, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव पुकारताच साताऱ्याहून आलेल्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवेंद्रराजेंचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.
मुंडे भाऊ-बहीण लक्षवेधी
मंत्रिमंडळात प्रथमच मुंडे भाऊ-बहीणची जोडी आहे. हे दोघेही भाऊ-बहीण अनेकांसाठी लक्षवेधी ठरले. शपथ घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंकडे बघून स्मितहास्यही केले. शपथविधी सोहळ्याला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंसह काही मंत्र्यांचे कुटुंबीयही आवर्जून हजर होते.
गुलाबरावांच्या आवाजाने घायाळ
शपथ घेणारे प्रत्येक मंत्र्यांचा आवाज सिमीत होता. मात्र, शिंदे सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी शपथ घेताना सुरुवात करताच परिसरात एकच उत्साह संचारला. त्यांचा बाणेदार व दमदार आवाजाने शपथविधी सुरू असल्याचा भास झाला. एरव्ही माईकची गरज नसावी, असा गुलाबरावांचा आवाज आहे. तो शपथविधी घेताना अनेकांनी अनुभवला.
मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे एकमेव मुस्लीम चेहरा आहेत.