Ashutosh Ranka CJP Jaipur Attack: जयपूरमध्ये CJPच्या टिमवर गुंडाचा हल्ला...; आशुतोष रांकांचा भाजपवर गंभीर आरोप
या हल्ल्याप्रकरणी आशुतोष रांका यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “हल्ल्यात वाहनांच्या काचा आणि मोबाईल फोन फोडण्यात आले. एका महिला सहकाऱ्यालादेखील मारहाण करण्यात आली आणि तिचा शर्ट फाडण्यात आला. आमच्या टीममधील एका सदस्याचा हात फ्रॅक्चर झाला.” असा आरोप रांका यांनी केला आहे.
रांका म्हणाले, “आज संपूर्ण देशाने भाजपची गुंडगिरी प्रत्यक्ष पाहिली. पोलिसांना याठिकाणी हा प्रकार होणार असल्याची माहिती आधीपासूनच होती. जयपूरचे हे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडले. आम्ही ४८ तासांचा अल्टिमेटम देत आहोत. हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे आणि शाळा तपासणी थांबवण्याचा आदेश मागे घेतला पाहिजे. असे न झाल्यास, आम्ही संपूर्ण राजस्थानमध्ये आंदोलन करू आणि दिलावर यांच्या राजीनाम्याची मागणी करू.” असा इशारा आशुतोष रांका यांनी दिला आहे.
तत्पूर्वी, सकाळी सुमारे ८ वाजता, काही सीजेपी कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी धक्काबुक्की केली. गावकऱ्यांनी त्यांना गावातून हाकलून दिले. सीजेपीविरोधात घोषणाबाजी करत गावकऱ्यांनी सरकारी शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली लावून गावातील मुख्य रस्ता अडवला आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष यांच्यासह १० ते १५ सीजेपी कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीजेपीने वाटिका रोडवरील भट्टावाला सरकारी शाळेची पाहणी करण्याची योजनाही आखली होती, पण या प्रकारामुळे ही पाहणी तुर्तास रद्द करण्यात आली आहे.
या सगळ्या प्रकरावर आशुतोष रांका यांनी ट्विट करत राजस्थान भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “कंवरपुरा येथील रामपुरामधील सरकारी शाळा गेल्या अनेक वर्षांपासून म्हशींच्या गोठ्यात चालवली जात आहे. मी नुकताच तिथे पोहोचलो आहे. पण तिथे पोहोचलेल्या आमच्या टीममधील काही सदस्यांवर भाजपच्या गुंडांनी पुन्हा हल्ला केला.
येथील विद्यार्थी म्हशींच्या गोठ्यात शिकत आहेत, हे भाजपला मान्य आहे, पण आम्ही या शाळा सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, हे त्यांना मान्य नाही. यापेक्षा अधिक लाजिरवाणे काय असू शकते? असा संतापजनक सवालही रांका यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, सीजेपीच्या टिमला मारहाण करणारे हे गावकरी नसून भाजपने भाड्याने आणलेले गुंड आहेत. त्यांचे नेते, कमल प्रधान, तिथल्या गरीब लोकांची जमीन बळकावण्याचे काम करत आहेत. मुलांना म्हशींच्या गोठ्यात शिकवले जात आहे, आणि जेव्हा आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भाजप आपले गुंड पाठवत आहे. किती लाजिरवाणी परिस्थिती आहे. असही संतापही रांका यांनी व्यक्त केला आहे.






