रुपाली चाकणकर यांची दीपक मानकर यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अजित पवार गटाची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र काही नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर हे नाराज असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी शनिवारी (दि.19) राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना पुण्यामध्ये धक्का बसला आहे. दीपक मानकर यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आता रुपाली चाकणकर यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते दीपक मानकर?
अजित पवार यांच्या पक्षाचे नेते दीपक मानकर यांनी पक्षाने संधी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. अजित पवार गटातील दोन नेत्यांना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी देण्यात आली. मात्र शब्द देऊन देखील मानकर यांना संधी न दिल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून शपथ घेतलेल्या नेत्यांवर देखील रोष व्यक्त केला. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली. तसेच रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली म्हणून नाराजी व्यक्त केली. दीपक मानकर म्हणाले की, “आम्हाला का संधी मिळाली नाही, रुपाली चाकणकरांनाच सातत्याने संधी का मिळते, त्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद देता, 24 तास तुमच्यासोबत असतात म्हणून त्यांचीच बाजू तुम्ही घेणार का, आम्हाला का नाही विचारणार. सुनील तटकरे यांनी एवढी तप्तरता आमच्यासाठी देखील दाखवावी,” अशा शब्दांत दीपक मानकर यांनी आपली नाराजी उघड केली होती.
दीपक मानकर यांच्या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे. चाकणकर म्हणाल्या की, ‘मानकर यांना शहराध्यक्षपद देताना मी भगिनी म्हणून मानकर यांच्या पाठीशी उभी होते. पण, त्याने अस का केलं मला माहिती नाही,’ असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात अखिलेश यादव यांची एन्ट्री; उद्या येणार राज्याच्या दौऱ्यावर
पुढे रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यात जर तीन जागा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्या असत्या, तर महिला म्हणून मला आमदारकी मिळाली असती. परंतु, दोनच जागा आम्हाला मिळाल्या, पुढच्या वेळी माझा विचार केला जाईल, मला अपेक्षा होती आणि मी मागणी देखील केली होती. पण, महायुती सरकारचे आभार मानते, मला परत एकदा महिला आयोगाचं अध्यक्ष पद देण्यात आलंय,” असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.