पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात आंदोलन करत सुनील तटकरेंची आक्रमक भूमिका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत. पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांचा धर्म विचारुन हा हल्ला करण्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या हल्ल्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. देशामध्ये ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाच्या वतीने मुंबईमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
पहलगाममध्ये निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. सुनील तटकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे, नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ आणि अनेक कार्यकर्तांनी आज दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत मूक आंदोलन केले. हे मूक आंदोलन आम्ही हल्ल्याच्या विरोधात केलं. देशाच्या दृष्टीने ही घटना गंभीर आहे. देशाच्या एकात्मतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज सर्व भारतीयांच्या मनात चीड आहे. निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला गेला. या हल्ल्याविरोधात भारत सरकार प्रयत्न करतच आहेत. राज्य देखील लक्ष ठेऊन आहे. प्रमुख नेतेही गांभीर्याने लक्ष देत आहेत,” अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याबाबत सुनील तटकरे म्हणाले की, ‘या बैठकीला प्रफुल पटेल हे उपस्थित राहणार आहेत. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, उबाठाचे नेते का उपस्थित नाही राहणार मला महिती नाही, असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. आपल्या देशावर अशा प्रकारे चोख उत्तर दिलं गेलं पाहिजे. टीका टिप्पणी करणं सोपं आहे. केंद्र सरकार पूर्ण ताकदीने कारवाया करत आहे. पुन्हा राजकीय पक्षांना विनंती आहे, भारतीय म्हणून सामोरे जायला पाहिजे,” असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले आहे.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे अडकले आहेत. त्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी अडकलेल्या पर्यटकांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. तर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी राज्य सरकार दोन विमाने करुन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.