नांदेडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी ११२ क्रमांकावर फोन केला आणि त्यांच्यासोबत अर्धा तास बोलला. त्यांना सांगितले की मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलो आहे. पत्नी खूप छळ करत आहे. घरी वाद देखील घालत आहे. मला जगायचं नाही, तिच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याची लोकेशन घेण्यासाठी त्याला अर्धा तास बोलते केले. मदतीसाठी त्याच्या जवळ जाताच त्याने गोदावरी नदी पात्रात उडी मारून आपलं जीवन संपवलं. घटनेच्या दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह पाच ते सात किलोमीटर दूर बोंढार परिसरातील गोदावरी नदी पात्रात आढळून आला आहे.
नेमकं काय घडलं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव साईनाथ प्रकाश नून्नेवार (वय 25) असे आहे. १० सप्टेंबर रोजी साईनाथ हा दुपारी दुकानातून निघून गेला आणि जुना मोंढा येथील नवीन पूल उडाणपुलावर पोहोचला. यावेळी त्याने ११२ क्रमांकावर फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. पोलिसांकडून त्याची समजून काढण्याचा प्रयत्न केला जात होता. पत्नी आणि सासरच्या त्रासाला मी कंटाळलो आहे..मला आत्महत्या करायची आहे अस तो म्हणत होता. लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांनी त्याला बोलत केलं. शेवटी तो जुना मोंढा येथील नवीन पुलाजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलीस जवळ येताच त्याने कठड्यावर चढून गोदावरी नदीत उडी मारली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहली होती. चिठ्ठी आणि मोबाईल कॅरिबॅगमध्ये ठेवून खिशात ठेवले होते. पोलिसांकडून शोध घेण्यात आला,मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचा शोध काही लागला नाही. अखेर दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी दुपारी बोंढार परिसरातील नदी पात्रात साईनाचा मृतदेह आढळून आला.
यापूर्वी दोन विवाह झाले होते
साईनाथ हा नांदेड शहरातील शारदानगर येथील रहिवाशी आहे. त्याचे आई वडील मोलमजुरी करतात. साईनाथ हा कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानात काम करत होता. २५ एप्रिल २०२५ रोजी त्याचा विवाह विवाह मुखेड तालुक्यातील जाहूर येथील राजेश्री हिच्या सोबत संपन्न झाला होता. विशेष म्हणजे राजश्री हिचे यापूर्वी दोन विवाह झाले होते आणि हा तिचा तिसरा विवाह होता. तिच्या हातावरील मेहंदी सुखण्यापूर्वीच दोघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. दरम्यान पन्नास हजार रुपये दे नाहीतर पोलीस ठाण्यात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करते आणि सर्वांना जेलमध्ये टाकते, अशी धमकी पत्नी आणि सासरच्या मंडळीनी दिली. घटनेच्या दोन दिवसा पूर्वी साईनाथने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता
गुन्हा दाखल
पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून साईनाथने आत्महत्या केल्याची तक्रार मयताची आई संगीता नुन्नेवार यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मयताची पत्नी राजेश्री नुन्नेवार, सासू अनिता अशोक पांचाळ, शंकर अशोक पांचाळ आणि योगेश अशोक पांचाळ या चार जणा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.