संग्रहित फोटो
पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्षांनी संघटनबांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे सक्षम पक्षकार्यालय असणे गरजेचे होते. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या पुढाकाराने हे कार्यालय उभे राहिले आहे. आपण महायुतीत असलो तरी जिथे युती शक्य नाही, तिथे परिस्थिती पाहून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी चालतील; पण केवळ तिकिट न मिळाल्याने आपला कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जाऊ नये. पुण्यात आपण 162 जागांसाठी तयारी केली पाहिजे, असे सांगत पटेल यांनी प्रत्यक्षात ‘एकला चलो रे’चा संदेशच दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. मतचोरीचा आरोप करून राहुल गांधी महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. विरोधक गोबेल्स नीतीचा वापर करत आहेत. या खोट्या प्रचाराला आपण ठाम प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे पटेल म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही स्वबळावर लढण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. आमचा पक्ष प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असलेला आहे. राज्यात आम्ही महायुतीतून लढणार असलो, तरी अनेक शहरांतील राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. अंतिम निर्णय राज्यातील तीन प्रमुख नेते घेतील, असे ते म्हणाले.
भाजपचीही जोरदार तयारी
राज्यात लवकरच महापालिका निवडणूक होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आता महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काही पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर करायचा आहे. त्यासाठी कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती की भाजपा स्वबळावर लढणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.