भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
Pakistan News: केंद्रीय तपास यंत्रणांच्या गोटातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेले १५ फोन नंबर सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व १५ फोन नंबर्स लष्करातील सैनिक, निमलष्करी दलातील जवान आणि सरकारी खात्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे. सीआरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक मोती राम जाट यांच्या चालू तपासात हा प्रकार उघडकीस आला आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, SRPFचे सहाय्यक उपनिरीक्षक मोतीराम जाट य यांनाही तीन महिन्यांपूर्वी या पाकिस्तानी गुप्तहेरासोबत भारताशी संबंधित माहिती शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तपास यंत्रणांनी हा खुलासा केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ने २७ मे रोजी मोती राम जाट यांना अटक केली होती. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवस आधीपर्यंत मोती राम जाट सीआरपीएफ बटालियनमध्ये येथे तैनात होते, परंतु हल्ल्याच्या फक्त पाच दिवस आधी ते दिल्लीत तैनात होते.
या प्रकरणात केलेल्या तपासादरम्यान आणखी धक्कादायक प्रकारही उघडकीस आले. यात मोतीराम जाट हेच नव्हे तर इतर १५ फोन नंबरही पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होते. अधिकाऱ्यांनी या नंबरच्या कॉल रेकॉर्ड्स आणि डेटाची तपासणी केली. या या पाकिस्तानी ऑपरेटिव्हचे कोडनेम सलीम अहमद असल्याचे आढळून आले आहे. या १५ फोन नंबरचे कॉल रेकॉर्ड आणि इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड स्कॅन करण्यात आले. यापैकी ४ नंबर भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांचे, ४ पॅरामिलिटरी फोर्सच्या कर्मचाऱ्यांचे आणि उर्वरित सात नंबर विविध सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांचे असल्याचे आढळून आले.
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या नंबरद्वारे मोती राम जाट संपर्कात होता तो नंबर कोलकाता येथून खरेदी करण्यात आला होता. सिम सक्रिय करण्यासाठीचा ओटीपी देखील लाहोरमध्ये बसलेल्या पाकिस्तानी ऑपरेटिव्हला पाठवण्यात आला होता. कोलकाता येथून हा नंबर खरेदी करणारा व्यक्ती कोलकाताचा रहिवासी आहे. त्याने २००७ मध्ये एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले होते नंतर २०१४ मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झाला. तो वर्षातून दोनदा कोलकाता येथे येत असे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मोती राम जाटला भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांच्या कालावधीत गुप्तचर माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे १२,००० रुपये दिले गेले. हे पैसे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. प्राथमिक चौकशीत जाटने दावा केला आहे की, तो प्रथम चंदीगडमधील एका टीव्ही चॅनेलमध्ये कार्यरत पत्रकाराच्या संपर्कात आला. त्यानंतर फोन आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधला. या काळात त्याने अनेक कागदपत्रे शेअर केल्याची कबुलीही दिली आहे.
यानंतर तो एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी संपर्कात आला आणि माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. जाटने सुरक्षा दलांच्या तैनातीची माहिती, विविध एजन्सींच्या केंद्रांची माहिती तसेच सैनिकांच्या हालचालींबाबत संवेदनशील माहिती पाकिस्तानी हँडलरला पुरवल्याचा आरोप आहे.