(Photo - Social Media)
गडकरी हे लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या कार्यक्रमात बोलत होते. ट्रस्टच्या उभारणीत गडकरींचा मोठा वाटा असून, या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात एकल विद्यालये चालवली जातात. याच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीच्या संदर्भात त्यांनी नव्या पिढीला जबाबदारी देण्याबाबत वक्तव्य केले होते.
गडकरींच्या कार्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, त्यांनी केवळ संस्था उभारण्याचे काम केले असून, ती संस्था विस्तारण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. आता ट्रस्टच्या पुढील वाटचालीसाठी नव्या पिढीने पुढे यावे, अशी त्यांची भूमिका होती.
“मी आता जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे ट्रस्टच्या वाढीसाठी नव्या पिढीला संधी देऊन त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली पाहिजे,” या आशयाचे त्यांचे वक्तव्य असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले.
गडकरींचे वक्तव्य केवळ ट्रस्टच्या कामकाजाशी आणि भविष्यातील नेतृत्वाशी संबंधित होते. त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. संबंधित कार्यक्रमही ट्रस्टचा होता आणि तो कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, नागपुरातील कार्यक्रमात गडकरी यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. महाराष्ट्रातील कोणतेही आदिवासी गाव विजेपासून वंचित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी गावांमध्ये वीज पोहोचल्यास विकासाचे चित्र अधिक स्पष्टपणे दिसेल, असे सांगितले.
‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
अलीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली. या टीममध्ये ६५ सदस्य असून त्यापैकी ५१ नवीन चेहरे असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षातील संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराचीही चर्चा सुरू आहे.
अशा वातावरणात गडकरींचे वक्तव्य समोर आल्याने त्याकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले गेले. मात्र, आता त्यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला असून, गडकरींचे वक्तव्य केवळ लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या भविष्यातील वाटचालीशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.






