Wai News: पाचगणीच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग! बाजारपेठेतील शौचालयांची दुरवस्था; पर्यटकांची मोठी कुचंबणा
Panchgani News : पाचगणी पर्यटन स्थळवरील बाजारपेठेतील स्वच्छता गृहाची अवस्था दुर्लक्षामुळे दयनीय झाली आहे. त्यामुळे शहाराच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग लागताना दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शॉपिंग सेंटरमधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने नगरसेवक प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास जाहीर निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पाचगणीमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. नगरपरिषदेच्या वतीने पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पर्यटन कर वसूल केला जातो. मात्र, ही वसुली होत असताना मूलभूत सुविधांच्या नावाने मात्र आनंदीआनंद आहे. मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिला पर्यटकांची कुचंबणा होत असून, येथील ई-टॉयलेट्स गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद अवस्थेत आहेत. ७ एप्रिलपूर्वी ही कामे पूर्ण होण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत, ज्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. परंतु, ज्या गोष्टींचा थेट संबंध पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्याशी व सोयीची आहे, त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रसाद कारंजकर यांनी केला आहे. शॉपिंग सेंटरमधील शौचालयांची दुरवस्था ही एक पर्यटन स्थळ म्हणून शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब ठरत आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून त्याचा थेट फटका स्थानिक व्यवसायावर बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Operation Tiger : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’चा थरार? संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
येणारे दोन महिने पर्यटनाच्या हंगामाचे (सीझनचे) आहेत. या काळात पर्यटकांची संख्या दुप्पट होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे. “आम्ही अनेकदा लेखी निवेदने दिली, प्रत्यक्ष पाहणी केली, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. जर १५ दिवसांच्या आत या शौचालयांचे नूतनीकरण आणि दुरुस्ती काम सुरू झाले नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल,” अशा कडक शब्दांत कारंजकर यांनी प्रशासनाला सुनावले आहे. आता या इशाऱ्यांनंतर तरी सुस्त प्रशासन जागे होणार की पर्यटकांचे हाल कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






