फोटो सौजन्य - Social Media
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षात भाजपने उडी घेतली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुनावत, “जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका,” असे सुचक विधान केले. गोरेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी दोन्ही पक्षांना फटकारले. “महायुतीच्या सर्व आमदारांनी जनतेच्या विश्वासाला शोभेल असे वागले पाहिजे,” असे सांगत दरेकर यांनी पालकमंत्री पदावरून रस्त्यावर सुरू असलेले वाद महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि विशेषतः रायगड जिल्ह्याला शोभणारे नसल्याचे ठणकावले. “पालकमंत्री पद म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न नाही. या वादाचे व्हिडीओ बाहेर येणे लज्जास्पद आहे,” असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने नाकारून महायुतीला मोठा जनाधार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महायुतीतील पक्षांनी संयमाने वागावे. भाजपने संयम राखला आहे, आम्ही पक्ष नेतृत्वाच्या पुढे कधी गेलो नाही. भाजपच्या सहकारी पक्षांनीही संयम पाळून वादविवाद टाळावा व आपापल्या नेतृत्वाकडे भूमिका मांडावी,” असा सल्ला त्यांनी दिला.
पदासाठी सुरू असलेल्या संघर्षावर बोलताना दरेकर म्हणाले, “दोघेही पक्ष असेच भांडत राहिले तर ‘तुला नाही, मला…’ अशी परिस्थिती निर्माण होईल. या जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे.” दरेकर यांनी भाजपच्या ताकदीबद्दलही भाष्य केले. “मी स्वतः राज्याचा विरोधी पक्षनेता होतो. भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र आम्ही पक्षाच्या निर्णयाचा आदर केला. संयम राखून पुढे जाणे हेच आमचे धोरण आहे,” असे त्यांनी सांगितले.
महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता प्रवीण दरेकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. “भाजप नेहमीच चांगल्या विचारांच्या आणि सामाजिक कामात पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींना योग्य संधी देतो. स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती अद्याप मला निश्चित नाही. मात्र, त्या भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल आणि आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत,” असे दरेकर म्हणाले.
जगताप यांची महाड परिसरातील राजकारणात विशिष्ट ओळख आहे आणि त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाडसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातून जर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरेकरांच्या या विधानांमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश महायुतीच्या प्रतिमेला सकारात्मक बळ देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.