फोटो सौजन्य - Social Media
AI आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल घडत आहेत. याचा लाभ घेऊन राज्य शासन आरोग्य, कृषी, ग्रामविकास आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा करत आहे. यामुळे नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी परिषदेत ते बोलत होते. या वेळी दुबई इकॉनोमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हादी बद्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही लवकरच जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी बनेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताने जागतिक पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत प्रगती केली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचा निर्धार आहे. महाराष्ट्रानेदेखील १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती होत असून, दुर्गम भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी डिजिटल पद्धतींचा उपयोग करण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच उपलब्ध करून दिले जात आहे.
कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान, आणि जमिनीची सुपीकता कमी होणे यांसारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. यासाठी राज्य शासनाने सौरऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवले आहे. २०२६ पर्यंत १६ गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रासाठी सौर ऊर्जा कंपनी स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊर्जा स्वावलंबनाकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे.
तसेच जलयुक्त शिवार अभियानासारख्या उपक्रमांमधून राज्यातील जलसंपत्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे. या अभियानामुळे आतापर्यंत २४ हजार गावे जलसंपन्न झाली असून, पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्यांवर प्रभावीपणे मात करण्यात मदत झाली आहे. त्याचबरोबर राज्य शासन आयआयटी मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थांसोबत हातमिळवणी करून संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत आहे. द्रोण प्रकल्पाच्या अंतर्गत कंट्रोल अँड कमांड सेंटर तसेच द्रोण पोर्टची उभारणी केली जात असून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावागावांपर्यंत आधुनिक सुविधा पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
पायाभूत सुविधांमध्येही राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुंबईतील सागरी किनारा रस्ता आणि अटल सेतूसारखे प्रकल्प दळणवळण अधिक गतिमान करत असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडथळे दूर करण्याचे काम करत आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडत आहेत आणि त्यामुळे राज्याचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.