आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी मनसे पद पुर्नरचना केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले. तर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसे पक्षाची एकही जागा निवडून न आल्यामुळे मनसेने आता पक्षीय रचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिती दिली आहे.
राज्यामध्ये अनेक महापालिकेच्या निवडणूका राहिल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुकीसाठी मनसे ॲक्शनमोडमध्ये आली आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली असून अमित ठाकरे यांच्यावर देखील मोठी जबाबदारी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमध्ये आज (दि.23) मनसे पक्षामधील पदाधिकारी, नेतेमंडळी यांची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पक्षातील रचनेमध्ये आणि पदांमध्ये बदल करण्यात आले आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले की, “मुंबईत नव्याने काही पदरचना केलेली आहे. मुंबईत पहिल्यांदाच शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष असेल. आतापर्यंत पक्षात विभागाध्यक्ष पद होतं. एक शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष तीन अशी रचना असेल, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी पदाच्या जबाबदारीबाबत देखील खांदेपालट केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना मुंबईचे शहराध्यक्ष म्हणून राज ठाकरेंनी जबाबदारी दिली आहे. ते म्हणाले की, “कुलाबा ते माहीम-शीव पर्यंत यशवंत किल्लेदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिमेकडचा उपनगरचा भाग कुणाल माईनकर आणि पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्यावर जबाबदारी दिली आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या? कसं काम करायचं? ते येत्या 2 ताखरेला लेखी स्वरुपात त्यांना सांगितलं जाईल. पक्षामध्ये केंद्रीय समिती नेमली आहे, जी प्रत्येक घटकाकडे बारकाईन लक्ष ठेवेल, संवाद साधेल. बाळ नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय समितीची जबाबदारी आहे. नितीन सरदेसाईंवर विभाग अध्यक्षांची जबाबदारी असेल. अमित ठाकरे शाखाध्यक्षांची जबाबदारी संभाळतील” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. यामुळे अमित ठाकरे यांच्या खांद्यावर आता शाखाध्यक्षांची जबाबदारी असणार आहे.
सध्या अशी रचना मुंबईमध्ये केली असून लवकरच ती ठाण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाणार आहे. राज ठाकरे म्हणाले की, “या ठाण्यातही अशीच एक केंद्रीय समिती असेल, त्यात अविनाश जाधव, राजू पाटील, अभिजीत पानसे, गजानन काळे असतील. यामुळे दोन्ही बाजूने पक्ष बांधला जाईल, अशी रचना केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात केलेला हा बदल आहे. एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रात ही रचना होईल” अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे धन्यवाद मानले आहे. ते म्हणाले की, महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. पक्षाची ही खूप मोठी जबाबदारी आहे. मोठा विश्वास दाखवला आहे. आमचं सर्वात पहिलं काम असेल, मिशन मुंबई. आता लवकरच स्ट्रिम लाइन होईल. मुंबई महापालिका जोरात, जोमात लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू. नेमणुकांचा विचार हा राज ठाकरे यांनी केला असेल. निश्चितपणे मुंबई महापालिकेत बदल दिसेल. आजपासून मनसे मिशन महापालिका सुरु, असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.