अजित पवारांच्या मुंबईतील इफ्तार पार्टीमधील मुस्लीम समाजाच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा पलटवार (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : सध्या रमजानचा महिना सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये एका इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी हिंदू मुस्लीम एकात्मेबाबत वक्तव्य केले. रमजानचे बंधुत्वाचा संदेश देणारा महिना म्हणून वर्णन केले. जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाहीत, असे मुस्लीम समाजाला आश्वासन देताना अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावरुन आता महायुतीमध्ये खडाजंगी सुरु आहे.
अजित पवार यांनी जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाहीत केलेले वक्तव्य हे अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांना टोला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या. नितेश राणे यांनी अनेकदा मुस्लीम समाजाला आव्हान देणारी वक्तव्य केली आहेत. यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पवार विरुद्ध राणे असा संघर्ष निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले नारायण राणे?
खासदार नारायण राणे यांनी देखील अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या भूमिकेवर महायुतीमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून, “अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असं वाटतं”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही.” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.
काय म्हणाले होते अजित पवार?
त्यांनी मुस्लिम समुदायाला आश्वासन दिले की भारत विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. आपण कोणत्याही फुटीरतावादी शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. आपण नुकतीच होळी साजरी केली आहे, गुढीपाडवा आणि ईद येत आहेत – हे सर्व सण आपल्याला एकत्र राहण्यास शिकवतात. आपण सर्वांनी मिळून तो साजरा केला पाहिजे, कारण एकता हीच आपली खरी ताकद आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमचे भाऊ अजित पवार तुमच्यासोबत आहेत. जो कोणी आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींना आव्हान देण्याचे धाडस करेल, जर कोणी दोन गटांमध्ये भांडण निर्माण करण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करेल, तो कोणीही असो – त्याला सोडले जाणार नाही, त्याला माफ केले जाणार नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.