'सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक'; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार
मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र‘ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना, प्रवेशानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अहिर यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला.
उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्या हिऱ्याला जवळ करण्याची संधी मिळाली तर त्यातून विश्वास निर्माण होतो. शिंदे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संधी देऊन सामान्य कार्यकर्ताही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे दाखवून दिलं.”
अहिर यांनी उपसभापतीपदाच्या जबाबदारीबाबतही भूमिका स्पष्ट केली. “रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून उल्लेखनीय काम केलं आहे. त्याच परंपरेची गरिमा जपत मीही काम करेन. ज्या भागात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत आहे, त्या ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करेन,” असे ते म्हणाले.
राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देताना अहिर यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “आम्ही सोबत असलो तर चांगले आणि सोबत नसलो की नालायक, अशी भूमिका घेतली जाते. ही अत्यंत दुर्दैवी मानसिकता आहे. माझ्यावर स्वार्थासाठी पक्ष बदलल्याची टीका होत आहे. ती होऊ द्या. योग्य वेळी योग्य व्यासपीठावर त्याला उत्तर देईन,” असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या कामगिरीचा उल्लेख करताना अहिर म्हणाले, “आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत मी काम केलं आहे. विधानसभा आणि मुंबई महापालिकेतील माझं योगदान तेथील नागरिकांना चांगलं माहीत आहे. काही लोकांना वाटतं, आम्हीच सर्वकाही आहोत आणि इतरांचं कोणतंही योगदान नाही; पण वस्तुस्थिती वेगळी आहे.”
ठाकरे गटातील सहा खासदारांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांनीही पक्षांतर केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.






