"खारेपाटाचे अस्तित्व शिल्लक ठेवण्यासाठी अतुल म्हात्रेंना विधानसभेत पाठवा" - जयंत पाटील
पेण/ विजय मोकल :- “खारेपाटाचे अस्तित्व शिल्लक ठेवण्यासाठी अतुल म्हात्रे सारख्या विद्याविभूषित व्यक्तीला विधानसभेत पाठवा” असे आवाहन जयंतभाई पाटील यांनी वाशी येथे अतुल म्हात्रे मार्गदर्शन करताना केले.महाविकास आघाडी शेकाप पुरस्कृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाशी येथील जगदंबा माता मंदिर येथे जयंतभाई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी आमदार जयंतभाई पाटील, उमेदवार अतुल म्हात्रे,यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा-“ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो”; काय म्हणतोय राहुल गांधींचा चाहता
यावेळी मार्गदर्शन करताना जयंतभाई पाटील यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली आहे. पाटील म्हणाले की, ‘स्वार्थासाठी पक्ष बदलायचे आणि जनतेकडे मत मागायला यायचे. अशांना जनता उभं करणार नाही. पुढे ते असंही म्हणाले की, विरोधकांचा व्यवसाय काय तर शेतकऱ्यांच्या जमिनी विकून दलाली करणे. यामुळे गरिबांच्या जमिनी विकणाऱ्यांना आता ठेचायचे आहे. ही लढाई अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई आहे. खारेपाटातील विकासासाठी शिट्टी वाजवून दलालांना हद्दपार करायचे आहे. असे पाटलांनी भर सभेत विरोधकांवर कडव्या शब्दांत आरोप केले आहेत.
पेणमध्ये शेकाप संपलेला पक्ष असे विरोधक म्हणत होते. परंतु अतुल म्हात्रेंच्या रूपाने शेकाप पक्ष भरारी घेत आहे. पेण मतदार संघात शेकापने आगरी उमेदवार कधी दिला नव्हता पण आता पेण विधानसभेला आगरी उमेदवार दिलेला आहे. त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत थोड्याच दिवसात तोडगा निघेल. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना उमेदवार अतुल म्हात्रे यांनी, ‘आपली लढाई विचारांची आहे. चांगल्या कामांची आहे. यामुळे आपला विजय निश्चीत आहे. येणारे प्रकल्प सक्तीने जमिनी घेवू पाहत आहेत. आमचा विकासाला विरोध नाही पण शासन कवडी मोलांनी जमिनी घेवू पाहात आहे. विकासाचा केंद्रेबिंदू येथील स्थानीक भूमिपुत्र झाला पाहिजे. भागीदार झाला पाहिजे अशा प्रकारचे मॉडेल इथे उभारण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.’येथील नेतृत्वाने विकासाचे काम केले नाही, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही.
आपल्याला समाजातील १००० बिल्डर निर्माण करून या पेण विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी आपल्याकडे विकासचे व्हिजन असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी २० तारखेला शिट्टी समोरील बटन दाबून बदल घडवायचा आहे. असे आवाहन उमेदवार अतुल म्हात्रे यांनी केले. यावेळी ऍड. रोशन पाटील, मोहिनी गोरे, महेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना अतुल म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.