शिंदे गट नेते व उद्योग मंत्री उदय सामंत आणि मनसे राज ठाकरे यांची भेट झाली आहे(फोटो - एक्स)
मुंबई : विधानसभा निवडणुकीपासून राज्यामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र निकाल आल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी विजय मिळाला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. तर राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळवता आलेली नाही. यामुळे नेत्यांमध्ये नाराजीचा पूर आला असून भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. दादरमधील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंसोबक २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाविषयी संवाद साधला असल्याचे देखील सांगितले आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “पुण्यात विश्व मराठी संमेलन झालं होतं. त्यावेळी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. त्याला ते उपस्थित राहिले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांची माझी भेट झाली नव्हती. त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी इथे आलो होतो. आज आमच्यात मराठी भाषेसंदर्भात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या बद्दल गप्पा मारल्या. राजकीय कुठचीही चर्चा झाली नाही. या भेटीला कोणी राजकीय स्पर्श करु नये. राज ठाकरेसमवेत चर्चा केल्यावर अजून काही गोष्टी कळतात” असे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी राज ठाकरे यांच्या व्यक्तीमत्तावाचे कौतुक देखील केले. उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे असं व्यक्तीमत्व आहे, राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आपल्या ज्ञानात भर पडते. या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. मराठी उद्योजकांवर अन्याय होऊ नये. मराठी भाषा, साहित्य, कलाकार यांच्याबाबत काय करता येईल, या विधायक गोष्टींवर गप्पा स्वरुपात चर्चा झाली. असे मत उदय सामंत यांनी स्पष्टपणे मांडले आहे.
आज शिवतीर्थ, दादर येथे राज ठाकरे साहेब यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा आणि विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाविषयी संवाद साधला.@RajThackeray #shivsena #EknathShinde #udaysamant pic.twitter.com/Y2H2AERUT4 — Uday Samant (@samant_uday) February 22, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांनी उदय सामंत यांना शिंदे गट आणि मनसेची युती होणार का? याबाबत प्रश्न केला. याबाबत उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? हा माझ्या दृष्टीने फार मोठा विषय आहे. या पातळीवरच्या चर्चेत मी कधी पडलो नाही” “मला अवाक्यातले, झेपणारे प्रश्न विचारा, त्यावर मी उत्तर देऊ शकतो. एकत्र येण्याबद्दल त्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आजची चर्चा राजकारण विरहीत होती, असे स्पष्ट मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.