अखेर शिंदेंनी डाव टाकलाच! राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप
महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर तर पक्षप्रवेशाला उत आला आहे. कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असून, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्के दिले आहेत. आता पुन्हा एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकला असून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. त्याचे धक्के मात्र काँग्रेसला बसले आहेत. गोंदियातील काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते.
माजी आमदार सहसराम कोरोटे हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कोरोटे हे नाराज होते. अखेर तीन महिन्यांनी कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच कोरोटे यांनी पक्षप्रवेश केला.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने माजी आमदार कोरोटे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते प्रचंड नाराज होते. त्यामुळं शिंदेंच्या नेतृत्वात कोरोटेंनी शिवसेनेत प्रवेश केला. कोरोटेंच्या नाराजीचा मोठा फटका काँग्रेसला गोंदियात बसला आहे. कोरोटे यांच्यासह परिसरातील हजारो कार्यकर्ते आणि काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सूडभावनेतून माझं तिकीट कापल्याचा आरोप कोरोटे यांनी नाना पटोले यांच्यावर केला. आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे कोरोटे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “मला हलक्यात घेऊ नका; ज्यांनी मला हलक्यात घेतले आहे त्यांना मी आधीच सांगितलं आहे. मी एक सामान्य पक्ष कार्यकर्ता आहे, पण मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि प्रत्येकाने मला या समजुतीने घेतलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सर्व काही ठीक चालले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलिकडच्या विधानांमध्ये याचे संकेत दिसतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात वॉकयुद्ध सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी दिलेल्या ‘टांगा पलटी’ विधानाचा पुनरुच्चार केला.
पत्रकारांनी शिंदे यांना त्यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘ज्यांनी मला हलके घेतले आहे त्यांनी मी हे आधीच सांगितले आहे… मी एक कामगार आहे, एक सामान्य कार्यकर्ता आहे.’ पण मी बाळा साहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. प्रत्येकाने मला हे लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणूनच जेव्हा मी ते हलके घेतले तेव्हा मी २०२२ मध्ये बदल घडवून आणला. सरकार बदलले आणि आम्ही सामान्य लोकांच्या इच्छेचे सरकार आणले. म्हणून मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हे संकेत समजून घ्यायचे आहेत त्यांनी ते समजून घेतले पाहिजे.