New Sena Bhavan: ठाकरे-शिंदे वाद नव्या वळणावर! दादरच्या 'सेनाभवना'ला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मोठा मास्टरप्लॅन
सूत्रांच्या माहितीनुसार,शिंदे गटाच्या शिवसेनेचा राज्यभर झपाट्याने विस्तार होत असताना मुंबईत स्वतःचे मध्यवर्ती आणि सुसज्ज मुख्यालय असावे,अशी मागणी सातत्याने केली जात आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मागणीनंतर शिंदे गटाकडून नव्या सेनाभवनासाठी दोन संभाव्य जागांची पाहणी करण्यात आली. यामध्ये एक जागा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra Kurla Complex) परिसरात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानापासून काही अंतरावर असल्याची चर्चा आहे. तर दुसरी जागा दादर परिसरातील असून उपमुख्यमंत्री शिंदेंनी या जागेला पसंती दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाची संघटना विस्तारण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने नव्या कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेशही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्वतंत्र मुख्यालय असणे आवश्यक असल्याचे मत पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक शिवसेना भवनाच्या धर्तीवर नव्या ‘सेनाभवना’ची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.
मराठी अस्मिता आणि शिवसेनेच्या परंपरेशी दादरचा जवळचा संबंध असल्याने पक्षाचे मुख्यालयही दादरमध्येच असावे. त्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीकेसीपेक्षा दादरला अधिक प्राधान्य दिले जावे,असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.
दरम्यान, दादरमधील संभाव्य जागेबाबत काही तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या अडचणी दूर झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत आधुनिक आणि प्रभावी मुख्यालय उभारून पक्षाचे संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याचा शिंदेसेनेचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मात्र, नव्या सेनाभवनाबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्व अंतिम निर्णय कधी जाहीर करते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






