शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Dada Bhuse on Malegaon bomb blast verdict : नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता नाशिकचे शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री दादा भुसे म्हणाले की, “न्यायालयाच्या माध्यमातून काँग्रेसला चपराक मिळाली. ज्यांनी कुणी दुष्कर्म केलं त्यांना शोधून शिक्षा करणं अपेक्षा आहे. त्याकाळच्या राजकर्त्यांनी राजकारण केलं. तेव्हा निरपराध लोकांना जेलमध्ये राहावे लागले. माननीय न्यायालयाने न्यायनिवाडा केला असून यामुळे दृष्ट लोकांना चपराक मिळाली,” असा टोला मंत्री दादा भुसे यांनी कॉंग्रेस पक्षाला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मंत्री दादा भुसे म्हणाले की, “ज्यांनी कृत्य केलं त्यांना शासन झालं पाहिजे. भगव्याला बदनाम करण्याचे षडयंत्र केलं गेलं. याचा केविलवाणा प्रयत्न झाला. पेशंट लोकं ऍडमिट केली जात होती तेव्हा मालेगावच्या शिवसेनेने केलं. हिंदू संघटनांनी रक्तदान केलं. त्यावेळी राजकारण केलं, साधू संतांनी सेवा केली त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं, वरिष्ठ न्यायालयात सुद्धा हाच निर्णय कायम राहील. निरपराध लोकांना गंभीर कलम लावले, मूळ गुन्हेगारांपर्यंत गेले असते तर शासन झालं असतं,’ असे देखील मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते दादा भुसे यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे. दादा भुसे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या काळात भगवा दहशतवाद हा विषय आणला. काँग्रेस वाल्यांनी देशाची मागितली पाहिजे. निरपराध साधू संतांना जेलमध्ये टाकलं, न्यायालयाने सिद्ध केलं. बाळासाहेब ठाकरेंना आज आनंद झाला असेल. काँग्रेसने जी अंमलबजावणी केली त्याचे दुःख होतं. पोलीस विभागाची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखणे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बदनाम केलं, भगवा दहशतवाद हिंदू आतंकवाद शब्द वापरले. मालेगावला न्याय मिळाला पाहिजे, मुंबई स्फोटात जे गेले त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे,” अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दहशतवाद भगवा कधीच नव्हता…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये सर्व आरोपींची निर्दौष मुक्तता करण्यात आली. यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, दहशतवाद भगवा कधीच नव्हता, आहे आणि कधीही राहणार नाही! अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.