जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला लाच घेताना सापडल्यावर सुप्रिया सुळेंना संशय व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून राजकारण देखील जोरदार रंगले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर महिलेला धमकी दिल्याचा आरोप देखील केला होता. मात्र आता ही आरोप करणारी महिलाच लाच घेताना रंगेहात सापडली आहे. मात्र यावर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला लाच घेताना सापडण्यावर संशय घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी काही प्रश्न उपस्थित करुन महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, “नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून? इतकंच नाहीतर नक्की महिलेने पैसे मागितले का? 1 कोटींची कॅश देणाऱ्याकडे आली कुठून? या देशाने आणि याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली तर 1 कोटी रूपयांची कॅश आली कुठून? हाच मोठा प्रश्न आहे की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे,” अशी प्रश्नांची सरबत्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “संजय राठोड आणि जयकुमार गोरे यांच्यावर असे आरोप झाले. कोणत्याही महिलेबद्दल जेव्हा असे आरोप होतात तेव्हा ती कोणाची तरी लेक किंवा सून असू शकते. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये आपण अतिशय संवेदनशीलपणे बोलले पाहिजे. कोणत्याही महिलेबाबत संवेदनशीलपणे बोलले पाहिजे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महिलेने एक कोटी रुपये खरंच मागितले होते का? तिच्या पिशवीमध्ये ते पैसे मुद्दाम टाकण्यात आले की खरंच तिच्याकडे काही आढळलं आहे? असे सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले आहेत. हा खूप गंभीर विषय आहे. हे आरोप कोणी केले हे समोर आले पाहिजे. आणि एवढी एक कोटी रुपयांची कॅश कुठून आली,” असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. यानंतर आता तिला पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरेंवर केलेल्या आरोपांचे प्रकरण संपवण्यासाठी संबंधित महिलेने तब्बल ३ कोटींची खंडणी मागितले होते. त्यानंतर या महिलेला १ कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिलेने जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणी गोरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे.