बिहार निवडणुकीत दिसणार तिसरी आघाडी; ओवैसींचा पक्ष तब्बल 100 जागा लढवणार(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीपासून वेगळी असलेली तिसरी आघाडी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)’ ने चालवली आहे.
या पक्षाचे नेतृत्व असदुद्दीन ओवैसी स्वतः करत आहेत. हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी अलीकडेच पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सीमांचलचा व्यापक दौरा केला आहे. त्यांनी तेथे अनेक जाहीरसभा घेतल्या आणि कार्यकत्यांशी नवीन राजकीय गतिशीलतेवर चर्चा केली. किशनगंजमध्ये पत्रकारांशी बोलताना ओवैसी म्हणाले, ‘मी बिहारमधील अनेक सहकाऱ्यांना भेटण्यास आणि नवीन मैत्री करण्यास उत्सुक आहे. राज्यातील लोकांना एका नवीन पर्यायाची आवश्यकता आहे आणि आम्ही ते बनण्याचा प्रयत्न करत आहोत’.
तसेच आम्ही आरजेडी प्रमुख लालू प्रसाद आणि महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांना पत्र लिहून महाआघाडीत एआयएमआयएमसाठी काही जागा देण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी रस दाखवला नाही. जनता निवडणुकीत याला उत्तर देईल, असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.
सीमांचल भागांत एमआयएमचे वर्चस्व
सीमांचल हा बिहारचा ईशान्य भाग आहे. त्यात कटिहार, किशनगंज, अररिया आणि पूर्णिया या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मुस्लिम बहुल लोकसंख्या, गरिबी आणि विकासाचा अभाव यांसारख्या मुद्यांमुळे हा प्रदेश राजकीय पक्षांसाठी दीर्घकाळापासून लोकप्रिय राहिला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत, पक्षाने २० जागांवर उमेदवार उभे करून आपली राजकीय ताकद दाखवली. या निवडणुकीत एआयएमआयएमने पाच जागा जिंकल्या होत्या. परंतु पाचपैकी चार आमदार राजदमध्ये सामील झाले.
हेदेखील वाचा : Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
ओवैसींचे ‘ते’ विधान चर्चेत
‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी असा दावा केला होता की, लोक ‘आय लव मोदी’ हे कौतुकास्पद मानतात. परंतु जर कोणी “आय लव मोहम्मद” असे म्हटले तर त्यांच्यावर टीका केली जाते.