अबू आझमी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावर UP CM योगी आदित्यानाथ यांची टीका (फोटो - टीम नवराष्ट्र)
उत्तर प्रदेश : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मागील तिन्ही दिवस अधिवेशन जोरदार गाजत आहे. काल (दि.04) अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे अधिवेशन गाजले. तर आज (दि.05) समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या वक्तव्याचे आता उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील पडसाद पहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशच्या विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. समाजवादी पक्षाने अबू आझमी यांच्या विधानाचे खंडन करावे. त्यांना पक्षातून हाकलून लावा. नाहीतर त्याला उत्तर प्रदेशात घेऊन या, आम्ही त्याच्यावर उपचार करू, या कडक शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी रोष व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “किमान ज्यांचे नाव घेऊन तुमचा पक्ष राजकारण करतो त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचे आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेला आहे. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे. औरंगजेबाचे वडील शाहजहान यांनी लिहिले होते की देवाने अशी मुले कोणालाही देऊ नयेत. तुम्ही जाऊन शाहजहानचे चरित्र वाचावे. औरंगजेब भारताच्या श्रद्धेवर हल्ला करणार होता, तो भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता, कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही,” असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.
औरंगजेब को समाजवादी पार्टी अपना आदर्श मानती है…
जो औरंगजेब को अपना नायक मान रहा हो उसको भारत में रहने का अधिकार नहीं…
अपने विधायक को एक बार उत्तर प्रदेश में भेज दीजिए बाकी उपचार हम करवा देंगे… pic.twitter.com/6YbSY2cJ77
— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 5, 2025
पुढे ते म्हणाले की, “अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत आणि औरंगजेबाला त्यांचे आदर्श मानतात. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्या ‘कम्बख्त’ला पक्षातून हाकलून लावा… त्याला उत्तर प्रदेशला बोलवा, आम्ही त्याच्यावर उपचार करू. उत्तर प्रदेशचे लोक त्याच्याशी चांगले वागतील. समाजवादी पक्षाने औरंगजेबाला आदर्श मानून या विधानाचे खंडन करावे,” अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राच्या विधीमंडळातून निलंबनाची कारवाई
समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. तसेच औरंगजेबाचे कौतुक देखील केले. “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळातून त्यांचे एकमताने निलंबन करण्यात आले. तर उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील खडाजंगी झाली.