सपा खासदार जया बच्चन यांच्या महाकुंभवरील वादग्रस्त विधानावर विश्व हिंदू परिषद नाराज आहेत (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेळ्याबाबत देशासह जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोट्यवधी साधूंनी अमृतस्नान केले असून अनेक भाविकांनी पाण्यामध्ये डुबकी मारली आहे. मात्र सध्या अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांचे महाकुंभमेळ्यावरील वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर यावरुन टीका केली असून गंभीर आरोप देखील केले आहेत. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या लोकांना नदीमध्ये फेकल्याचा गंभीर दावा केला आहे. यावरुन राजकारण तापले असून यावर आता विश्व हिंदू परिषदेने कारवाईची मागणी केली आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे जया बच्चन या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असून आता त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. जया बच्चन यांनी प्रयागराजमध्ये सोडण्यात आलेल्या महाकुंभातील पाण्याचे वर्णन सर्वात दूषित पाणी असल्याचे सांगितले होते. मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाण्यात टाकण्यात आल्याचा दावा सपा खासदाराने केला. जया बच्चन यांच्या या विधानावर विश्व हिंदू परिषदेने (VHP) त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. या विधानावर विश्व हिंदू परिषदेसह भाजप नेत्यांनी आणि धार्मिक संघटनांनीही आक्षेप व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सपा खासदार जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यावरुन विश्व हिंदू परिषदने आक्रमक भूमिका घेतली आहे. विश्व हिंदू परिषदेचे मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली आहे. शरद शर्मा म्हणाले की, चुकीच्या आणि खोट्या विधानांद्वारे खळबळ उडवल्याबद्दल जय बच्चन यांना अटक करावी. महाकुंभ हा हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आधार आहे, जिथे धर्म, कर्म आणि मोक्ष मिळतो. कोट्यवधी भक्तांच्या भावना या कुंभमेळ्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जया बच्चन यांना कुंभमेळ्यावरील वक्तव्यामुळे अटक करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
महाकुंभमेळ्याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार जया बच्चन यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या की, “सध्या सर्वांत जास्त दूषित पाणी कुठे आहे? तर कुंभमेळ्यात.. चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत. यामुळे नदीचं पाणी दूषित झालं आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाही. कुंभमेळ्याला जाणाऱ्या सर्वसामान्य लोकांना कोणत्याही विशेष सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्ता नाही. पण व्हीआयपी लोकांसाठी सर्व सुविधा आहेत. कोट्यवधी लोक तिथे आल्याचा खोटा दावा केला जातोय. इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथे कसे जमू शकतात?”असा संशय खासदार जया बच्चन यांनी उपस्थित केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
अभिनेता सोनू निगम यांनी देखील जया बच्चन यांना त्यांच्या वक्तव्यावरुन फटकारले आहे. सोनू निगम याने सोशल मीडियावर पोस्ट करुन रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर जया बच्चन यांचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. सोनू निगम याने लिहिले आहे की, जया बच्चनजींनी मानसिक संतुलन गमावले आहे. अमिताभजी, त्याला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा, असा टोला गायक सोनू निगम यांनी लगावला आहे.