'2014 मध्ये काँग्रेसचा झालेला पराभव नियोजित होता?'; माजी खासदार कुमार केतकर यांनी केले धक्कादायक आरोप
नवी दिल्ली : 2014 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. तर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा विजय झाला. आता याच विजयावरून राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांनी मोठं विधान केले आहे. ‘2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा सामान्य राजकीय बदलाचा परिणाम नव्हता. तर तो अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलच्या मोसादच्या कथित कटाचा परिणाम होता’, असा आरोप त्यांनी केला आहे.
संविधान दिनानिमित्त बुधवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात कुमार केतकर यांनी एक धक्कादायक दावा केला. त्यांनी म्हटले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला मोठा पराभव हा सामान्य राजकीय बदलाचा परिणाम नव्हता, तर तो अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि इस्रायलच्या मोसादच्या कथित कटाचा परिणाम होता. काँग्रेसने २००४ मध्ये १४५ जागा जिंकल्या होत्या आणि २००९ मध्ये ही संख्या २०६ पर्यंत वाढली होती. जर हाच कल कायम राहिला असता तर २०१४ मध्ये काँग्रेसला अंदाजे २५० जागा मिळू शकल्या असत्या. निकाल अगदी उलट होते. पक्षाला फक्त ४४ जागा मिळाल्या. इतकी लक्षणीय घट केवळ मतदारांच्या असंतोषामुळे होऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केले.
हेदेखील वाचा : Maharashtra Municipal Election: पालिका निवडणुकीत ‘घराणेशाही’चा कळस; शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी
दरम्यान, कुमार केतकर यांनी म्हटले की, मोसाद आणि सीआयएने भारतीय राज्ये आणि मतदारसंघांचा तपशीलवार डेटा संकलित केला आहे, ज्याचा वापर ते राजकीय समीकरणांवर प्रभाव पाडण्यासाठी करू शकतात. २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध निश्चितच नाराजी होती, पण इतकी नाही की काँग्रेसला ऐतिहासिक पराभव पत्करावा लागला.
राजकीय वर्तुळात एकच खळबळ
माजी खासदार कुमार केतकर यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान केलेले हे विधान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. यावरून सीआयए किंवा मोसादकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. असे जरी असले तरी काँग्रेस पक्षाकडून यावर अधिकृतपणे टिप्पणी केली गेली नाही.
हेदेखील वाचा : मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…






